मुंबई : चेंबूर येथे घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपी गणेश चंद्रकांत हांडोरे याला अपघातग्रस्त गाडी लपविण्यासाठी आणि फरार होण्यासाठी मदत करणारे त्याचे वडील खासदार चंद्रकांत हांडोरे यांना देखील अटक करावी, अशी मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच या संपूर्ण दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणीही शेवाळे यांनी केली. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या गोपाळ आरोटे या तरुणाची चेंबूरच्या झेन रुग्णालयात जाऊन शेवाळे यांनी भेट घेतली आणि त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शेवाळे म्हणाले की, “गोपाळ आरोटे यांच्या अपघाताची ही घटना अत्यंत दुर्दैवी असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांसह या ठिकाणीं आलो. त्यांच्या उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत. गेल्या काही काळात हिट अँड रन अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सदर घटनेनंतर आपल्या मुलाला वाचविण्यासाठी आरोपी गणेश यांचे वडील खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्याच सांगण्यावरून अपघात ग्रस्त गाडी चेंबूरच्या महाविद्यालयात लपवण्यात आली, तसेच गणेश हांडोरे याला फरार करण्यात आले. या सर्व माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो. या आधीच्या हिट अँड रन प्रकरणात ज्याप्रमाणे आरोपीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले, तोच नियम लावून सदर प्रकरणात खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी ही मागणी मी करतो. अशा दुर्दैवी घटकांमध्ये केवळ राजकारण करून आवाज उठवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या दुर्घटनेत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, हे दुर्दैवी आहे. ” अशा शब्दात शेवाळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
शुक्रवारी रात्री चेंबूरच्या खारदेव नगर परिसरातून गोपाळ आरोटे आपल्या दुचाकीवरून जात होते. यावेळी गोपाळ आरोटे यांना गणेश चंद्रकांत हांडोरे यांच्या चारचाकी वाहनाने उडवले. या अपघातात गोपाळ गंभीररित्या जखमी झाले. तर हांडोरे यांनी तेथून तत्काळ पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार हांडोरे यांनी अपघातग्रस्त गाडी त्यांच्या चेंबूर पश्चिमेकडील महाविद्यालयाच्या परिसरात लपवून फरार होण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर त्यांना पोलिसांनी अटक केली असून ते सध्या उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल आहेत.