मुंबई (रमेश औताडे) : हवामानावर आधारित फळपिक विमा योजना गेल्या अनेक वर्षांपासून सरकार राबवित आहे. आंबा व काजू या फळपिकांचा या योजनेत समावेश आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, या जिल्ह्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी स्व हिस्सा विमा कंपनीकडे भरला आहे. तरीही हजारो शेतकरी विमा परतावा मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, तापमानातील वाढ या सारख्या आपत्तींमुळे आंबा व काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकरी विमा परतावा मिळणेचे प्रतिक्षेत आहेत. परंतू जोखीम कालावधी संपून साडेतीन महीन्यांचा कालावधी संपला असताना देखील शेतकऱ्यांना विमा परतावा मिळाला नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघातर्फे संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी राज्याच्या कृषी सचिव जयश्री भोज यांना निवेदन दिले आहे.
राज्य शासनाकडून राज्याचा हिस्सा विमा कंपनीला दिल्यानंतर केंद्र शासन आपला हिस्सा विमा कंपनीला अदा करते त्यानंतर तीन आठवड्यात विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा परतावा देते. परंतू राज्य आणि केंद्र शासनाने अद्याप आपला हिस्सा विमा कंपनीला अदा केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा परतावा देण्यासाठी कोणत्याही हालचाली विमा कंपनीकडून अद्याप सुरु झालेल्या नाहीत असे चंद्रकांत मोकल यांनी सांगितले.
कोकणात जून ते ऑगस्ट या कालावधीत फळबागेच्या मशागतीचे काम केले जाते. किमान या कालावधीत तरी शेतकऱ्यांना पिक विमा मिळणे गरजेचे होते परंतू आता दसरा सणापूर्वी तरी विम्याचे पैसे मिळावेत असेही मोकल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने कृषी आयुक्त पुणे, रविंद्र बिनवडे यांनाही लेखी पत्र दिले आहे.