बदलापूर – राज्य सरकारने बदलापुरसाठी ५ एमएलडी पाणी १ एप्रिलपासून देण्याचा फेब्रुवारीमध्ये झालेल्या मंत्रालयातील एका बैठकीत घेण्यात आला होता. त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. उलट हे पाणी बदलापुरच्या केवळ पश्चिम भागात वळविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे बदलापूर पूर्व भागातील ग्रामस्थ आणि माजी नगरसेवकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बदलापूरची पाणीसमस्या सोडवण्यासाठी १ एप्रिलपासून एमआयडीसीचे ५ एमएलडी पाणी देण्याबाबतचा निर्णय फेब्रुवारीच्या अखेरीस मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला होता.या बैठकीला उद्योग विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जलसंपदा विभागाचे अधिकारी तसेच कुळगाव -बदलापुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे व काही माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे बदलापुरकर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र त्यांचा हा आनंद क्षणिक ठरला आहे. कारण अद्याप या निर्णयाची पूर्तता झालेली नाही.उलट हे पाणी केवळ बदलापूरच्या पश्चिम भागात वळविले जाणार आहे. त्यातच एमआयडीसीने पूर्व भागातील नागरिकांच्या गृहसंकुलांना नवीन नळ कनेक्शन देणे बंद केले आहे. त्यामुळे बदलापूर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. तरी ५ एमएलडी पाण्याचे समसमान वाटप झाले नाहीतर जनआंदोलन उभारण्याचा इशारा माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी दिला आहे.