प्रतिनिधी : महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजभान जागविण्यासाठी महात्मा गांधी जयंतीच्या पूर्व संध्येला घाटकोपर मध्ये एका ' निर्भय वॉक ' चे आयोजन करण्यात आले होते.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती,घाटकोपर ,राष्ट्र सेवा दल,घाटकोपर यांच्या पुढाकाराने तसेच विभागातील विविध सामाजिक संस्था,संघटना आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या सहकार्याने भटवाडी,गणेश मंदीर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून घाटकोपर पूर्व येथील रायगड चौक पर्यंत हा निर्भय वॉक काढण्यात आला. महाराष्ट्रातील मुलींवर, स्त्रियांवर दिवसेंदिवस घडणाऱ्या वाढत्या अत्याचार घटनांच्या विरोधात आवाज उठविण्याकरीता त्याच बरोबर सुरक्षित वातावरण आणि निकोप समाज तयार व्हायला हवा यासाठी एक पाऊल म्हणून हा निर्भय वॉक काढण्यात आला होता.
घाटकोपर पूर्व येथे झालेल्या सांगता कार्यक्रमात बोलताना तुषार गांधी म्हणाले की,बदलापूर प्रकरणात कुणाला तरी वाचविण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी घेतला का ? अक्षयला कठोर शिक्षा व्हायला हवी होतीच पण ती न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून करायला हवी होती.अभिनेत्री चिन्मयी सुमीत म्हणाल्या की,महिलांच्या सुरक्षितते साठी मोठया प्रमाणात घाटकोपर मधील महिला आणि सामाजिक कार्यकर्ते , राजकीय पक्षातील लोक एकत्र आले आहेत.त्यासाठी या मंडळींना मी धन्यवाद देते.असेच विविध प्रश्नासाठी एकत्र येत राहू या.राष्ट्रवादीच्या नेत्या राखी जाधव यांचे ही यावेळी भाषण झाले.
सातच्या आत घरात या असं सांगणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात अंधाराचा भेद करून मोकळा श्वास घेण्यासाठी संध्याकाळी 7 नंतर निघालेल्या या निर्भय वॉक मध्ये तरुण मुली आणि स्त्रियांचा मोठा सहभाग होता. सुरुवातीला श्रद्धा डान्स अकादमीच्या महिलांनी रस्त्यावर सुंदर असे ‘ पथ नृत्य ‘ सादर केले.आमीर काझी,निर्मला माने, सुदाम वाघमारे , बाविस्कर सर यांनी चळवळीतील गाणी सादर केली.
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी,अभिनेत्री चिन्मयी सुमीत,शिवसेनेचे सचिव आणि सामाजिक संस्था आणि सिव्हील सोसायटीचे संयोजक डॉ.संजय लाखे पाटील, मराठी भाषा केंद्राचे प्रा.दीपक पवार,राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव,काँगेसचे केतन शहा, राष्ट्रवादीचे ॲड.अमोल मातेले,शिवसेनेचे सुभाष पवार,शिवसेना महिला आघाडीच्या प्रज्ञा सकपाळ, काँग्रेसच्या जेनेट डिसोझा, कालू रहेमान,समाजवादी पार्टीचे फहाद अहमद, काँग्रेसच्या सुरभी द्विवेदी, राष्ट्र सेवा दलाचे शरद कदम, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे नंदकिशोर तळाशिलकर, विजय परब,अर्चना ताजणे,सूर्यकांत कळंबकर,जालिंदर सरोदे, आर.जी. हुले सर, गजानन भालेकर,अर्चना तांबे, शाकीर शेख, अन्वर दळवी,विभागातील शिक्षक, डॉक्टर, वकील आदी या ‘ निर्भय वॉक ‘ मध्ये तिरंगा सोबत चालत होते.
शिवसेनेचे नेते सुरेश पाटील,राष्ट्रवादीच्या नेत्या राखी जाधव, ॲड.अमोल मातेले ,काँग्रेसचे नेते केतन शहा आणि घाटकोपर मधील राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते शरद कदम,अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे शहाजी पाटोदेकर यांनी पुढाकार घेऊन सामाजिक संघटना आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांना एकत्र करण्यात पुढाकार घेवून या कार्यक्रमातून राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधील एक नवा संवाद सुरू केला आहे.
शाखा प्रमुख गजानन काकडे,शिवसेनेचे उपविभाग प्रमुख विलास पवार,निलेश जंगम,राजेश येलकर, आप्पा चव्हाण,शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सुहासिनी चव्हाण,काँग्रेसचे वैभव धनावडे, अशोक दौंड,किशोर पारवे,संदेश बालगुडे,प्रकाश कांबळे,राजेंद्र थोरात,निर्मला माने यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी हा निर्भय वॉक यशस्वी केला.