पांचगणी : आ. मकरंद आबा पाटील यांच्या अथक प्रयत्नातून पांचगणी येथे जिल्हा परिषद, सातारा यांचे मालकीच्या जागेवर महिला बचत गट योजनेसाठी ‘ बचतगट भवन ‘ इमारत (मानिनी मॉल) बांधणेसाठी तब्बल १३ कोटी ९६ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.

शासनाच्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापित स्वंयसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनासाठी विक्री केंद्र, कॉन्फरन्स हॉल आणि केफेटेरिया बांधणेसाठी हा निधी आहे. या मानिनी भवनांमुळे स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनास कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध होऊन महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. तसेच कॉन्फरन्स हॉल द्वारे महाबळेश्वर – पांचगणीचा ऐतिहासिक, नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा देशी विदेशी पर्यटकांपर्यंत पोहचवणेसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या निधी साठी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा अधिकारी जितेंद्र डूडी, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी विशेष सहकार्य केले आहे.
याच पद्धतीने तालुक्यातील हजारो बचत गट सदस्यांना याचा लाभ होणार आहे. तसेच जिल्ह्यातील अंदाजित २० ते २५ हजार पेक्षा जास्त महिलांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. या विक्री केंद्रामुळे स्वयंसहाय्यता समुहाचे उत्पादन विक्री साठी व्यासपीठ उपलब्ध झाल्याने स्वयंसहाय्यता समूहाची अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळेल. पर्यायाने ग्रामीण भागातील कुटुंबाचे अर्थकरणास चालना मिळेल. यासाठी आ. मकरंद पाटील यांनी याबाबत निधीसाठी पाठपुरावा केला आणि त्याला आज यश आले.
जिल्हा नियोजन वार्षिक योजनेअंतर्गत नाविण्यपुर्ण योजनेतुन हा निधी प्राप्त झाला असून उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित स्वयंसहायता गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांसाठी विक्री भवन मिळाल्याने आपोआपच पांचगणी – महाबळेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांना महिलांची आपली उत्पादने विकता येणार आहेत. डोंगराळ भागातील महिला आर्थिक सक्षम होण्यासाठी यामुळे मदत होणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.
या भावनांमुळे महाबळेश्वर तालुक्यातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.