सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यात स्त्री शक्ती संवाद यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत आहे . सर्वसामान्य जनता आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या शिवसेनेसोबत आहे. आज पाटणमध्ये जन आक्रोश मोर्चा निघाला असताना शासकीय यंत्रणेला वेठीस धरून हा मोर्चा दडपण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याचा निषेध करत आहे. अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या श्रीमती ज्योती ठाकरे यांनी सातारा येथील पत्रकारांशी संवाद साधताना तीव्र नाराजी पालकमंत्र्याबाबत व्यक्त केली.
पाटण येथे आज निकृष्ट रस्त्याच्या कामांबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल कदम यांच्या समवेत पाटणच्या खेड्यापाड्यातील नागरिकांनी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात मिळेल त्या वाहनाने पाटणचे अन्यायग्रस्त नागरिक मोर्चासाठी सामील झाले होते. यावेळी शासकीय यंत्रणेला सांगून पालकमंत्र्यांनी हा मोर्चा व त्यातील वाहने अडवण्याचा आरोप होत आहे. वास्तविक पाहता लोकशाही मार्गाने आपला आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याची भूमिका श्री हर्षल कदम व मोर्चा सामील झालेल्या असंख्य लोकांनी घेतली होती. शांततेने निघालेल्या व घटनेने अधिकार दिल्याप्रमाणे हा मोर्चा निघाला होता . या मोर्चाला उदंड प्रतिसाद लाभत असल्याचे पाहून शासकीय यंत्रणेचा वापर करून हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला आहे .खरं म्हणजे निकृष्ट रस्त्याची कामे होत असून काही कामे अपूर्ण असताना मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते. कामाच्या बागलबुवा करून काही लाभार्थींना सोबत घेऊन प्रसिद्धी मिळवली जात आहे. याचाही निषेध व्यक्त करण्यात आला.
सातारा जिल्ह्याचे सायरन मंत्री हे देवळात जाताना सुद्धा कॅनवाय घेऊन जात आहे. त्यामुळे अपघात होऊन त्याचा साताऱ्यात पत्रकारालाही फटका बसलेला आहे. अशा पद्धतीचा मुजोरपणा व माज आगामी पाटण विधानसभा मतदारसंघात मतदार नक्कीच उतरवल्याशिवाय राहणार नाहीत .अशीही प्रतिक्रिया श्रीमती ज्योती ठाकरे यांनी दिली या वेळेला त्यांच्या समवेत महिला संघटिका श्रीमती छाया शिंदे श्रीमती संजना मुणगेकर, श्रीमती रोशनी गायकवाड , श्रीमती युगंधरा साळेकर, श्रीमती सलमा शेख , श्रीमती कल्पना गिड्डे, सुनंदा म्हामुलकर आदी महिला शिवसैनिक तसेच माजी सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, गणेश अहिवळे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्रीमती ज्योती ठाकरे यांनी सांगितले की लेक लाडकी बहीण योजनेतून महिलांना भेटीत जोडून गर्दी जमवण्याचे काम केले आहे त्यांना पाणी सुद्धा मिळाले नाही शासकीय अधिकाऱ्यांना टार्गेट करून त्यांना या महिलांच्या सुविधांसाठी कामाला लावले जात आहे यावरून जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जन आक्रोश असून पितृपक्ष थांबल्यानंतर काही दिवसांनी निवडणूक निवडून येणाऱ्यांच्या बाबत शिवसेना व भाविकांचा आघाडीचे मान्यवर पक्षप्रमुख निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान याबाबत संबंधितांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.
