मुंबई (रमेश औताडे) : आत्म संरक्षणासाठी राज्यातील तरुणींना स्व रक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण फक्त काही दिवसांपुरते मर्यादित राहणार नसून, शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये संपूर्ण वर्षभर आठवड्यातून २ ते ३ वेळा तासिका स्वरूपात आयोजित केले जाणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
स्व रक्षण हा एक पर्याय नसून आजच्या काळाची गरज आहे. हर घर दुर्गा अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक महिलेला स्वतःचे रक्षण करण्यासाठी सुसज्ज करत आहोत. हा उपक्रम फक्त आत्मरक्षणाचे कौशल्य शिकवणार नाही, तर आपल्या महिलांमध्ये आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण करेल.असे लोढा म्हणाले.
३० सप्टेंबर रोजी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते ‘हर घर दुर्गा ” अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मुंबई , कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर केरळा स्टोरीज चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अदाह शर्मा यावेळी उपस्थित राहणार आहे.
राज्यातील १४ आय टी आय चे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. मुंबई, कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था असे करण्यात येणार आहे.अशी माहिती लोढा यांनी यावेळी दिली.