Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रमविआच्या ‘खोटा फॅक्टरी’ला न्यायालयाची सणसणीत चपराक; राऊत यांच्या शिक्षेवर भाजपा मुख्य प्रवक्ते...

मविआच्या ‘खोटा फॅक्टरी’ला न्यायालयाची सणसणीत चपराक; राऊत यांच्या शिक्षेवर भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी : उबाठा सेनेचा भोंगा आणि मविआचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेले संजय राऊत यांच्या खोटेपणाचे पितळ उघडे पडल्यावर आता त्यांनी न्यायसंस्थेवरही ताशेरे मारण्यास सुरुवात केल्याने, त्यांचा तोल पुरता ढळल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या कंड्या पिकविण्याचा राऊत यांच्या कारखान्याला न्यायालयाने टाळे लावले असून त्यांना झालेली शिक्षा म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडीच्या खोटे पसरविण्याच्या उद्योगाला मिळालेली चोख चपराक आहे, अशी खरमरीत टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. उपाध्ये बोलत होते. या निर्णयावर आक्षेप घेत खा. राऊत यांनी पुन्हा न्यायालयाचा अवमान केला असून न्यायालय त्याची दखल घेईल, अशी अपेक्षा असल्याचेही श्री. उपाध्ये म्हणाले.
मविआ सरकार सत्तेतून गेल्यानंतर संजय राऊत सैरभैर झाले असून महायुती सरकारच्या गतिमान विकास कामांमुळे सुरू असलेल्या प्रगतीची पोटदुखीही त्यांना जडली आहे. त्यामुळेच, सत्ता गेल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीने फेक नॅरेटिव्ह फैलावून जनतेची दिशाभूल करण्याचा कट रचला. राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याची अफवा, अटल सेतूला तडे गेल्याचा कांगावा, संविधान बदलण्याचा अपप्रचार, पुण्यात खासगी जागेत ट्र्क रुतला असताना रस्त्यातील खड्ड्यात ट्र्क घुसला असल्याचे वृत्त पसरवणे, महाराष्ट्राचा मणिपूर होणार अशी भाकिते करून नागरिकांमध्ये भय निर्माण करण्याचा कट, अशी अनेक कारस्थाने महाविकास आघाडीने करून पाहिली, आणि सारी बिनबुडाची असल्याचे सिद्ध होऊन ती फसली. अशा खोट्याच्या फॅक्टरीतून पिकणारे अफवांचे पीक संजय राऊत यांच्या डोक्यात उगवत होते, आणि मविआचे अन्य नेते त्याला खतपाणी घालत होते, असा थेट आरोपही उपाध्ये यांनी केला.
याच सडक्या मानसिकतेतून राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न आता त्यांच्या अंगाशी आला आहे. खोट्याच्या पाठीत सोटा या न्यायाने त्यांना त्याची फळे भोगावी लागणार असून महाविकास आघाडीने आता तरी यापासून बोध घेत आपली कातडी वाचवावी व राऊत यांचा भोंगा बंद करावा, असा सल्लाही श्री. उपाध्ये यांनी दिला. खोटी माहिती जाणीवपूर्वक पसरवून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा खा. राऊत आणि महाविकास आघाडीचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. न्यायालयाच्या या निर्णयातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धडा घ्यावा, असेही श्री. उपाध्ये यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments