
मुंबई : महाभ्रष्ट आणि अकार्यक्षम भाजपा-शिंदे सरकारमुळे गुन्हेगारी फोफावून निष्पाप लोकांचे बळी जातच आहेत पण या सरकारच्या दुर्लक्षामुळे आणखी एक मृत्यूचा सापळा यांनी रचला आहे. भ्रष्ट भाजपा-शिंदे सरकार व बीएमसीच्या दुर्लक्षामुळे एका मुंबईकराला आपला जीव गमवावा लागला आहे. ४५ वर्षीय विमला गायकवाड या महिलेचा रात्री उघड्या मॅनहोलमध्ये पडून झालेला मृत्यू हा अपघात नाही तर शांत डोक्याने घडवून आणलेली हत्या आहे, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
याप्रकरणी भाजपा-शिंदे सरकार व बीएमसीच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्सूनपूर्व कामांची पाहणी करण्याची फक्त इव्हेंटबाजी केली, चमकोगिरी करण्यातच मुख्यमंत्री शिंदे यांना फार रस आहे. मुख्यमंत्री खरेच तेवढे कार्यतत्पर आहेत का? तसे असेल तर मग विमला गायकवाड यांना जीव का गमवावा लागला? मॅनहोल उघडे का ठेवण्यात आले होते? त्याठिकाणी सावधगिरी बाळगण्याचा सूचना फलक का बसवण्यात आले नव्हते? पावसाळ्यापूर्वी मॅनहोल का झाकले गेले नाहीत? असे प्रश्न विचारत एका मुंबईकराने आपला नाहक जीव गमावला, या घटनेला भाजपा-शिंदे सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त आणि जे प्रशासकीय अधिकारी या दुर्घटनेला जबाबदार आहेत, त्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.
यावर्षी जेव्हा-जेव्हा मुसळधार पाऊस कोसळला, तेव्हा-तेव्हा मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, मुंबई ठप्प झाली आहे. मुंबईत ७५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला की त्या प्रत्येक वेळेस मुंबईकरांना त्रास सहन का करावा लागतो? नालेसफाई आणि पावसाळ्यापूर्वीच्या इतर कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे काँग्रेसने छातीठोकपणे सांगितले पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आता मात्र याचे स्वतंत्र ऑडिट करा आणि या तथाकथित कामांची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
‘मी काम करणारा मुख्यमंत्री आहे’, असे एकनाथ शिंदे सातत्याने सांगत असतात, त्यासाठी सरकारी पैशातून जाहिरातबाजी करून स्वतःची पाठ थोपटून घेतात पण त्यांचे सर्व दावे पोकळ असून सत्य लपून राहत नाही हेच विमला गायकवाड यांच्या घटनेने स्पष्ट झाले आहे. मुंबईकरांना घडल्या घटनांचा हिशोब हवा आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बीएमसीने तो हिशोब तात्काळ द्यावा, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.