मुंबई : संपूर्ण गणेशोस्तवात विसावा घेतल्यानंतर पावसाने मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार बॅटिंग केली आहे. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे भारतीय हवामान खात्याने (IMD)बुधवार आणि गुरुवार या दिवसांसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. आज दुपारपासून पावसाचा जोर वाढताना दिसून आला. मुलुंड, भांडुप तसेच अंधेरी भुयारी मार्ग यांसारख्या उपनगरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. तसेच लोकल सेवा देखील विस्कळीत झाली असून रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 25 , 26 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि गोव्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर शुक्रवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त असणार आहे’. बुधवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. मुलुंड, भांडुप तसेच अंधेरी भुयारी मार्ग यांसारख्या उपनगरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.तर मुंबईचा पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील एकूण साठा 99 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
रायगड, पुणे आणि पालघर या जिल्ह्यांना रेड अलर्ट
त्याचबरोबर पुढील दोन दिवस रायगड, पुणेसह पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषत: पुणे शहरात पावसाचा सर्वाधिक जोर पाहायला मिळाला. मगरपट्टा, कल्याणी नगर, धानोरी, लोहेगाव, वडगाव शेरी आणि घोरपडी या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत पुण्यातील शिवाजीनगर परिसरात 19.2 मीमी पावसाची नोंद झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सून शेअर झोन उत्तर महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आद्रतेचे प्रमाण वाढले असून येणाऱ्या काळात पावसाचे प्रमाण वाढेल. तर येत्या ३-४ तासांत मुंबई, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतील काही ठिकाणी गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 40-50 किमी वेगाने वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
