(वाशी, नवी मुंबई), दि. २० व २१ सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा गुणगौरव गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमापूजन व दीप प्रज्वलननाने झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू राजन वेळूकर व कर्नल तुषार जोशी उपस्थित होते. कुलगुरु राजन वेळूकर यांच्या हस्ते गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. कलगुरू राजन वेळूकर यांनी शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना आनंददायी जीवनासाठी व सर्वांगीण प्रगतीसाठी काय केले पाहिजे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
निवृत्त कर्नल तुषार जोशी यांच्या हस्ते शैक्षणिक , सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कर्नल तुषार जोशी यांनी आपल्या भाषणातून आपल्या जीवनातील विविध अनुभव मांडले. विद्यार्थ्यांनी जीवनात बांधिलकी, मेहनत, जिद्द, यांना महत्त्व दिले पाहिजे. तसेच “शारीरिक तंदुरुस्ती, सकस आहार, कोणतेही काम करण्याची हिंमत, आणि सहकाऱ्यांना धीर देण्याचे कौशल्य हे यशस्वी नेतृत्वाचे प्रमुख घटक आहेत,” असे प्रतिपादन केले.
या समारंभात ज्युनियर व सिनियर विभागातील विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.जलतरण, बुद्धिबळ, एनएसएस, एनसीसी या क्षेत्रातील तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांनी विशेष प्राविण्य मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ प्रतिभा देवणे यांनी तर आभार उपप्राचार्या प्रो डॉ. राजेश्री घोरपडे यांनी मानले.
केबीपी कॉलेजमध्ये गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा गुणगौरव
RELATED ARTICLES