मुंबई(रमेश औताडे) : जग बदलत आहे तसे नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. मात्र नवे तंत्रज्ञान ज्यांनी आत्मसात केले नाही असे उद्योग , नोकऱ्या , व्यवसाय धोक्यात आले. मात्र जे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासारखे असताना काही तांत्रिक कारणामुळे एका घटकाला आत्मसात करता आले नाही तो एक दुर्लक्षित घटक म्हणजे रेल्वे स्टेशन फलाटावर प्रवासी साहित्य उचलणारा लाल ड्रेस मधील ” कुली ” हा घटक.

१६ एप्रिल १८५३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे अशी पहिली रेल्वे धावली. तेव्हापासून रेल्वे फलाटावर प्रवाशांचे साहित्य डोक्यावर , खांद्यावर वाहून नेण्याचे हमालीचे काम करणारा हा कूली १८५ वर्षा पासून उपेक्षित राहिला आहे. आज बुलेट ट्रेन आली आहे तरीही सरकारने या घटकाला अद्याप न्याय दिला नाही.
काळ बदलला तसा प्रवासी आपल्या बॅगा बदलू लागला. पूर्वी पत्र्याच्या पेट्या होत्या त्या डोक्यावर घेऊन हमाल आपली रोजीरोटी मिळवत होता. आता बॅगा चाकावर पळू लागल्या आहेत. लहान मुलगाही एक मोठी व्हील बॅग आरामात ओढू लागला. काही ठिकाणी बग्गी आल्या आहेत. या बग्गी इलेक्ट्रिक आहेत. त्यामधे प्रवासी व त्यांच्या सामानाची सोय केलेली असते . ही बग्गी फलाटावरून थेट ओला कॅब पर्यंत जाते. तसेच सरकते जिने आले आहेत , तसेच महत्वाचे म्हणजे रेल्वे ला पर्यायी वाहतूक व्यवस्था भरपूर झाली आहे. पूर्वी जेवढे लोक रेल्वेने प्रवास करत होते तेवढे आता नाही. या व इतर कारणामुळे कुली च्या उदरनिर्वाहनाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
रेल्वे बोर्डाने काही कुली चतुर्थ श्रेणी मध्ये सामावून घेतले. मात्र जे मेडिकल अनफिट झाले असे कुली आज फलाटावर बेरोजगार असल्यासारखे बसून असतात. त्यांची कधी कधी भोनी सुध्दा होत नाही. त्या दिवशी काय करावे ? कुटुंबाला कसे पोसायचे असा विचार करत आत्महत्येचा विचार मनात येतो असे एका कुलीने सांगितले.
” लालवर्दी कुली युनियन ” चे मुंबई सेंट्रल स्टेशन वरचे बाळासाहेब सांगळे ३५ वर्ष कुली चे काम करत आहेत. ३५ वर्षात त्यांनी रल्वे व प्रवासी यामधील खूप बदल पाहिले. अनेक युनियनचे मोर्चे , धरणे आंदोलन , काम बंद इशारा देऊनही रेल्वे मंत्री व संबंधित अधिकारी यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. आज १९ हजार ६५० कुली आहेत. काही कुली रेल्वे बोर्डाने चतुर्थी श्रेणी मध्ये सामावून घेतले .त्यांचे आज वेतन ४० ते ५० हजार च्या घरात आहे. व आम्हाला मेडिकल अनफिट करून दिवसाला २०० रूपये मजुरी वर सोडून दिले आहे. कधी कधी २०० रुपये सुद्धा मिळत नाहीत. खाली हात उपाशी पोटी घरी जावे लागते.
आम्ही अनफिट होतो तर आमची मुले , पत्नी किंव्हा नातेवाईक रेल्वे बोर्डाने सामावून घेतले असते तर आमच्यावर उपासमारीची वेळ आली नसती. प्रत्येक वर्षी बजेट मध्ये करोडो रुपयांच्या घोषणा होतात मात्र इंग्रज काळा पासून हा लाल रंगाच्या कपड्यातील कुली मात्र बजेट मधे कुठेच दिसत नाही. अमिताभ बच्चन यांनी कूली चित्रपट मधून आमच्या व्यथा मांडल्या तरीही आम्हाला अद्याप न्याय मिळाला नाही. काही कुली वयोवृद्ध होऊन मरण पावले . जे काही आज जिवंत आहेत व न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना सरकारने न्याय द्यावा व काळाच्या पडद्याआड जाणारा हा कुली रेल्वे आहे तोपर्यंत कार्यरत ठेवावा. तरच पुढील पिढीला या घटकाचा इतिहास कळेल व तो ही आनंदाने कुली चित्रपटांमधील ” सरी दुनिया का बोझ हम उठाते हे ” हे गाणे भरल्या पोटाने हसत हसत गुणगुनेल.