मुंबई : पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केलेल्या कार्यासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. एनसीपीए येथे 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत उद्या 18 सप्टेंबर रोजी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
पर्यावरण व शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र देशात प्रथम
आता तापमान वाढीचे युग संपून होरपळीचे युग सुरू झाल्याने त्वरित कृतीची गरज संयुक्त राष्ट्र संघटनेने व्यक्त केली आहे. त्यास प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. यासाठी राज्यात मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीची स्थापना केली असून त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री श्री. शिंदे आहेत. अंमलबजावणीसाठी कार्यकारी अध्यक्षपदी पाशा पटेल यांना नेमून संबंधित सचिव यांचे कार्यकारी मंडळ देखील तयार करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यासाठी पहिले पाऊल टाकले. तापमान वाढ कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हरित महाराष्ट्राची संकल्पना त्यांनी मांडली. त्याशिवाय औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये 5 टक्के बायोमास वापरायचे देखील निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. त्यासाठी 11 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 1 लाख 20 हजार एकर क्षेत्रामध्ये बांबू लागवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे ॲग्रीकल्चर टुडे या संस्थेने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा दिल्लीमध्ये नुकताच सन्मान केला. त्याची दखल आता थेट जागतिक पातळीवर घेण्यात आली व वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमने पुढाकार घेऊन जागतिक स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या कामाची दखल घेतली आहे.
‘वर्ल्ड एग्रीकल्चर फोरम’ अन्नसुरक्षा विषयी जागतिक व्यासपीठ
‘वर्ल्ड एग्रीकल्चर फोरम’ हे अन्नसुरक्षा विषयी जागतिक नेत्यांना चर्चा करण्यासाठीचे व्यासपीठ आहे. जागतिक कृषी मंचचे अध्यक्ष डॉ. रुडी रॅबिंज हे आहेत. कृषी क्षेत्रातील प्रगतीच्या अनुषंगाने भविष्यातील धोरण आणि जागतिक स्तरांवर होत असलेल्या कामांची दखल घेऊन जागतिक पुरस्कारासाठी जगातील विविध देशातून नामांकन विचारात घेण्यात येतात. जागतिक परिणामकारक वनस्पती विज्ञान, कृषी विषयक विविध पैलूंबद्दल माहिती घेताना उत्पादन, व्यापार, तंत्रज्ञान, व्यवसाय, धोरण आणि आर्थिक परिस्थिती, पोषण, अन्न प्रक्रिया, पाणी आणि पर्यावरण या व्यापक बाबींचा समावेश करते. यासाठी निवड योग्यता आणि पूर्णतेसाठी नामांकनांचे पुनर्विलोकन करून, ते निवडीसाठी पाठवले जातात. निवड समिती नंतर नामांकनांचे पुनर्विलोकन करते आणि प्राप्तकर्त्याची शिफारस करते. बुधवारी 18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुंबईतील या कार्यक्रमाचे आयोजन फिनिक्स फाउंडेशन (लोदगा, जिल्हा लातूर) यांनी केले असून 18 सप्टेंबर या आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम एनसीपीए सभागृहात सकाळी 11 वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत विविध चर्चासत्रांमध्ये पार पडणार आहे. यामध्ये जगभरातील या विषयातले तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. त्याच दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत मुख्य सत्काराचा कार्यक्रम होईल.