प्रतिनिधी : राज्यातील विधानसभा निवडणूकांची घोषणा केव्हाही होऊ शकते असे वातावरण आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे महाविकास आघाडीशी फिस्कटलेले आहे. त्यामुळे महाविकास बहुजन आघाडीची कोणाशी युती होते याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही पक्षांशी वंचित बहुजन आघाडीची बोलणी सुरू आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.सोमनाथ साळुंखे यांनी दिली.
साळुंखे म्हणाले की, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्रातील अन्य शेतकरी संघटना यांची युती अगोदरच जाहीर झाली आहे. यामध्ये वामनराव चटक, शंकरराव धोंडगे पाटील यांच्या संघटनांसोबत राजू शेट्टी यांची आघाडी जाहीर झाली आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत असणारे आदिवासी पक्ष प्रामुख्याने गोंडवना पार्टी, भारतीय आदिवासी संघ अशा वेगवेगळ्या राजकीय पक्ष संघटनांसोबत वंचित बहुजन आघाडीची युती घोषित झाली आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात
राजू शेट्टी यांच्यासोबत आघाडी करताना काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेष करून वामनराव चटक यांनी राजू शेट्टी यांच्यासोबत युती केली आहे. वामनराव चटक हे राजोरा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तिथे वंचित बहुजन आघाडीने गोंडवना पक्षाशी आघाडी केल्यामुळे वामनराव चटक यांना ती जागा देण्याचा शब्द वंचित बहुजन आघाडीने दिल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात युती होऊ शकलेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि राजू शेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रात विभागीय स्तरावर आघाडी करण्याचे आणि बोलणी करण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी सकारात्मक बोलणी सुरू आहेत. त्यामुळे ती आघाडी पूर्णत्वास येण्याची आशा आम्हाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
बच्चू कडू यांना विरोध
राजू शेट्टी यांनी काही इतर राजकीय नेत्यांची नावे त्यांच्या बाईटमध्ये घेतली. काही इतर पक्षांसोबत वंचित बहुजन आघाडीने चर्चा करायला पाहिजे. जसे मनोज जरांगे पाटील, बच्चू कडू वगैरे. मात्र, बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा होऊ शकत नाही. कारण, ते अकोल्याचे पालकमंत्री असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यामुळे त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्यासोबत आघाडी करण्यास आमचा तीव्र विरोध असल्याचे साळुंखे यांनी नमूद केले.