Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रआ . शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारा- जावळीत चौकारा मारण्याच्या प्रतीक्षेत…

आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारा- जावळीत चौकारा मारण्याच्या प्रतीक्षेत…

प्रतिनिधी(अजित जगताप) : सध्या सर्वांचे लक्ष दहीहंडी व गणेशोत्सवाच्या अडून विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे .हे आता सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु, निवडणुका म्हणजे जय पराजय नसून सामान्य मतदारांसाठी आपण किती वेळ दिला? किती विकास केला? याचा लेखाजोखा असतो पण दुर्दैवाने तसं घडत नसल्याने पुन्हा एकदा भाजपचे म्हणजेच महायुतीचे आ. भोसले यांना आमदारकीचा चौकारा मारण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.
तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जावळी खोऱ्यातील कड्या कपारीतील मावळ्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी जिवाचे रान केले. आजही राजकीय पटलावर जावळी तालुक्यातील सामान्य मतदार हा छत्रपती राजकारणेशी निगडित आहे. त्याचबरोबर काही घेतलेल्या निर्णयामुळे दुखावलेले मतदार सुद्धा विरोधात नक्कीच आहेत. शेवटी लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यासाठी अंकुश असणे गरजेचे आहे. त्यामुळेच तर लोकशाही सुदृढ झालेली दिसते.
२००८ साली जावली विधानसभा मतदारसंघाचा फिर रचनेमुळे कायापालट झाला. हा मतदारसंघ रद्द करून जावळी तालुका सातारला जोडल्यामुळे खऱ्या अर्थाने यापूर्वी सातारा तालुक्यातील १८ गावांना जसा राजकीय वनवास भोगाव लागत होता. तशाच पद्धतीने आता जावळी तालुक्यातील सूत्र ही नाही म्हटली तरी सुरुची व जलमंदिर पॅलेस या दोन ठिकाणावरून हलतात .हे सुद्धा लपून राहिलेले नाही. २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आ .शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना एक लाख २७ हजार१४३ मते व भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र पाटील यांना २१३६५ मते आणि बहुजन समाज पक्षाचे केळघर तालुका जावळीचे सुपुत्र प्रशांत वसंतराव चव्हाण यांना २१४७ व इतर सहा मतदारांना सुद्धा मतदान झाले . ऑक्टोबर २०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भारतीय जनता पक्षात गेलेले आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना ५९ टक्के म्हणजे १ लाख १८ हजार ५ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी व भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेले दीपक पवार यांना ३७.०३ म्हणजेच ७४ हजार५८१ मते मिळाली होती . भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना ४३४३४ मतांची मताधिक्य मिळाले होते.
जावळी डोंगराळ भाग असून या ठिकाणी २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीचे ३२१८१ अनुसूचित जमातीचे ४०३५, मुस्लिम समाजाची१८३१२ असे १६ टक्के मते आहेत. तर मराठा, ओ.बी.सी. समाजाची८४ टक्के मते आहेत. तसं पाहिलं तर या मतदारसंघात सातारा शहरातील ४४.२८ म्हणजेच १ लाख५० हजार १५६ मतदार आहेत आणि मतदान केंद्र ४३२ आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सहजरित्या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात हॅट्रिक केलेली आहे. बदलत्या राजकीय भूमिकेमुळे आता सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासारखा हुकमी एक्का त्यांच्या जवळ असल्यामुळे त्यांचे राजकीय वजन चांगलेच वाढलेले दिसून येत आहे. .यापूर्वी जावळी विधानसभा मतदारसंघात दिवंगत माजी आमदार कैवारी लालसिंगराव शिंदे काका, कैवारी जी.जी. अण्णा कदम, कैवारी बाबासाहेब आखाडकर शिंदे, माजी आमदार सदाशिव सकपाळ, आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. सध्या भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
सातारा व जावळी एक संघ ठेवण्यामध्ये खरं श्रेय अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची आहे. त्यांना समर्थ साथ दिली ती आदरणीय माजी मंत्री छत्रपती अभयसिंहराजे भोसले व नुकतीच शंभरी पार केलेले आदरणीय जावळीचे माजी सभापती साहेबराव आबाजी पवार , माजी आमदार जी. जी. अण्णा कदम, माजी आमदार डी.बी. कदम यांनी राजकारणातील नैतिकता सुद्धा दाखवून दिली. पण अलीकडच्या काळात राजकारण म्हणजे निविदा काढून कामे मिळवणे. असा नवीन पॅटर्न सुरू झालेला आहे. हा पॅटर्न आता सर्व क्षेत्रात शिरल्यामुळे नावलौकिक प्राप्त व निष्ठावंत तसेच समाजातील सर्व स्तराची जाण असलेले कार्यकर्ते मिळणे दुरापास्त झालेले आहे. आता कमवायला शिका… फारसं गमवायला आपल्याकडील काही दाखवू नका. असाच संदेश देणारे निवडणुकीकडे व्यापार म्हणून बघत आहेत. ज्या ठिकाणी व्यापार आहे. त्या ठिकाणी खरेदीदार व विक्रीता यांचे साठे लोटे सुद्धा पाहण्यास मिळते. जावळी मध्ये खऱ्या अर्थाने हरित क्रांती आणली ती वसंतराव मानकुमरे यांनी हे सुद्धा मतदार विसरले नाहीत. पण आता त्याची अनेकांना झळ सोसावी लागत आहे.
सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात सध्याची निवडणुकी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पहिली पसंती आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या वतीने आमदार शशिकांत शिंदे,माजी आमदार सदाशिव सपकाळ, दीपक पवार ,सचिन मोहिते हे इच्छुक आहेत. यापैकी कुणाला तरी राजकीय पक्षाचे अधिकृत उमेदवारी जरी मिळाली तरी उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अजित दादा पवार गटाकडे गेलेले जावळीचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती अमित कदम हे सुद्धा उमेदवार ठरू शकतात .मात्र सध्या सर्व आरक्षण फुल झाल्यामुळे त्यांना नवीन पर्याय शोधावा लागेल. त्या शोधात ते नक्की असले तरी लोकसभा निवडणुकीत गाजलेले नाव म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे संजय गाडे यांना सातारा जावळी मधून चांगली संधी आहे. ते स्वतः विजय होऊ शकले नाहीत तरी प्रस्थापितांचा पराभव करू शकतात. अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झालेली आहे.

या सर्व घडामोडी मध्ये राजकारणामध्ये सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी आडवी तिडवी आघाडी – युती होत असल्यामुळे सध्या निश्चित असे धोरण किंवा तोरण बांधण्यासाठी कुणालाही घाई झालेली नाही. पण ,पुढील ऑक्टोबर महिन्यामध्ये थंडीच्या कडाक्यात अनेक जण राजकीय स्वेटर घालून रणांगणात उतरले तर आश्चर्य वाटणार नाही. शेवटी निवडणुका म्हणजे काहींसाठी पर्वणीच असते इतर वेळी मात्र आपल्या गावातील लोकांना आपले प्रश्न सोडवावे लागतात. हे मात्र लपून राहणार नाही.

चौकट

२६२ सातारा जावळी विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, सातारा जावळी मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका आणि सातारा तालुक्यातील वर्ये, दहीवड, परळी, अंबर्डे, शेंद्रे, सातारा ही महसूल मंडळे आणि सातारा नगरपालिका क्षेत्राचा समावेश आहे. जावळी तालुक्यातील अनेक जण सध्या सातारा तालुक्यातील मतदार संघात असल्यामुळे कमी समजणे राजकीय धोका ठरणार आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments