Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रमहाराणी येसूबाईंच्या स्फूर्ती स्थळासाठी श्री राजेशिर्के यांना वाढता पाठिंबा….

महाराणी येसूबाईंच्या स्फूर्ती स्थळासाठी श्री राजेशिर्के यांना वाढता पाठिंबा….


रत्नागिरी(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील स्वराज्याच्या कुलमुखत्यार व छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे शृंगारपूर येथे भव्य स्फूर्ती स्थळ व्हावे. या मागणीसाठी साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के हे आक्रमक झाले आहेत . या मागणीसाठी दिनांक ९ सप्टेंबर पासून रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत .या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळू लागलेला आहे. स्वराज्यासाठी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली अठरापगड जातीच्या मावळ्यांनी आपल्या जिवाचे रान केले. त्यातील राजेशिर्के व इतर अनेक घराण्यांनी खुद्द शिवरायांची सोयरीक होती .यापैकीच एक राजेशिर्के घराण्याने आपले तन-मन धन अर्पण केले आहे . छत्रपती संभाजी महाराजांच्या पट्टराणी कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्य संकटात असताना अत्यंत धीरोदात्तपणे या संकटाचा सामना केला .संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांचे रक्षण केले .तब्बल २९ वर्ष त्या मुघल बादशाह औरंगजेबाच्या नजर कैदेत होत्या. पण कधी त्या डगमगल्या नाहीत. बंदीवासातही त्यांनी शाहू महाराजांवर उत्तम संस्कार केले. आणि कर्तुत्वान राजा घडवला. मात्र महाराणी येसूबाईंचे हे कर्तुत्व इतिहासाच्या पानांमध्ये झाकोळल्यासारखे गेले आहे . याची खंत आता नव्याने अभ्यास करणाऱ्या मावळ्यांना अस्वस्थ करत आहे. या कर्तुत्ववान कुलमुखत्यार सम्राज्ञीचे समाधीस्थळ लोकस्मृतीतून नष्ट व्हावे. ही दुर्दैवाची बाब आहे . राजधानी सातारा येथील इतिहास संशोधकांनी येसूबाईंचे समाधीस्थळ शोधून काढली आहे. त्याच्या संवर्धनासाठीचा सातत्याने इतिहास प्रेमी व शिवप्रेमी मावळे पाठपुरावा करत आहेत.येसूबाई यांचे माहेर असलेले शृंगारपूर हे गाव देखील अजूनही दुर्लक्षित आहेत .कधीकाळी या गावात त्यांच्या पितृकुल राजेशिर्के घराण्याचा फार मोठा वाडा येथे होता, सरंजाम होता .परंतु या घडीला त्याचे भग्नावशेष मिळणे ही दुर्मिळ झाले आहे. अशा या विस्मृतीत गेलेल्या शृंगारपूर या गावी त्यांच्या कर्तुत्वाला साजेसे स्फूर्ती स्थळ उभे राहावे. म्हणून इतिहास संवर्धनासाठी सत्याग्रह म्हणून सातारचे माजी उपनगराध्यक्ष श्री सुहास राजेशिर्के व विनोद भिकाजी पवार शृंगारपूर हे गेले चार दिवस आमरण उपोषण करीत आहेत . त्यांच्या उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत असून महाराणी येसूबाई यांच्या स्मृतीस्थळाला न्याय मिळावा अशी जोरदार मागणी होऊ लागलेली आहे . शृंगारपूरच्या वाड्यातच महाराणी येसूबाईंचे बालपण गेले आहे. याच ठिकाणी अनेक वेळा छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य होते. आणि दुर्दैवाने याच भागातील एका वाड्यात त्यांना अटक झाली. एवढा मोठा ऐतिहासिक वारसा या पटलावरून दुर्लक्षित झाला आहे . या ठिकाणी येसूबाईंचे स्फूर्तीस्थळ होणे गरजेचे आहे. त्यांच्या कर्तुत्वाचा इतिहास दुर्लक्षिला जाता कामा नये हे स्मारक उभे न राहिल्यास पुढच्या पिढीला या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या बलिदानाचा इतिहास कळणार नाही . यासाठीच श्री राजेशिर्के व विनोद पवार शृंगारपूर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. छत्रपती शिवरायांचा इतिहास जतन करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत .त्या अनुषंगाने महाराणी येसूबाईंच्या स्मृतीस्थळासाठी तातडीने योग्य ते पाऊल उचलावे. अशी मागणी शिवप्रेमींनी केली असून या आंदोलनाचा हा पाचवा दिवस आहे.


RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments