मुंबई, (प्रतिनिधी) काळा किल्ला येथील श्री हनुमान सेवा मंडळाचे यंदाचे ६२ वे वर्ष “म…. माझ्या मराठीचा” या थीमवर गणरायाचे आगळे वेगळे रूप प्रसिद्ध मूर्तिकार पराग पारधी, यांनी साकारलेल्या कागदाच्या लगद्याच्या कलाकृतीतून पहायला मिळते. गणेश मूर्तीचे सुहास्य वदनाने नमस्तक होताना संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर यांनी संस्कृत भाषेतील गीता ग्रंथाचे प्राकृत मराठी भाषेत म्हणजेच ज्ञानेश्वरीत रूपांतर करताना आपल्या सहाव्या अध्यायात मराठी भाषेला अमृताची उपमा देत माझा मराठीचा बोल कौतुके । परि अमृताते हि पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन।। असे म्हणत मराठीला अजरामर केले. यातुनच प्रेरणा घेत यंदाचा समाजप्रबोधनपर देखावा साकारताना ‘म… माझ्या मराठीचा’ उत्सवाला पर्यावरणपूरकता असावी म्हणून कागदी लगद्याची मूर्ती तसेच मराठी भाषा टिकवण्यासाठी व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठीचा लिहिलेल्या घोष वाक्यांद्वारे देखावा उभारीत ‘म… माझ्या मराठीचा’ चला तर सुरुवात स्वतःपासून करूया.
“मराठी भाषेतच व्यवहार करेन, प्रतिज्ञा घ्या”….
आजपासून मी फक्त मराठी भाषेतच व्यवहार करेन, माझी बोलीभाषा ही मराठीच असेल, अशी भीष्म प्रतिज्ञा स्वतःपासून करीत मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म टिकवावा, मराठी भाषा टिकवावी म्हणून सकल मराठी भाषिकांनी एकत्र येत आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मना मनात वन्ही चेतवावा असे भाविकांना मंडळाचे कार्याध्यक्ष नाना आगवणे, अध्यक्ष प्रशांत खरात, सचिव प्रमोद खाडे आणि खजिनदार सोमनाथ आगवणे आवाहन केले आहे