प्रतिनिधी : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन प्रथमतः गणेश चतुर्थीच्या दिवशी ७ सप्टेंबर २०२४ रोजी करण्याचा घाट घालण्यात आला होता. धारावी बचाव आंदोलनाने आंदोलनाचा इशारा देताच हा कार्यक्रम रद्द करून तो १२ सप्टेंबर २०२४ रोजी करण्याचे ठरले. या भूमिपूजनाच्या आदल्या दिवशी ११ सप्टेंबर २०२४ रोजी लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम तसेच १२ सप्टेंबर रोजी ठरलेला भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा धारावी बचाव आंदोलनाने दिला होता. ठरल्याप्रमाणे ११ सप्टेंबर रोजी लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम पार पडला. या उपोषणाच्या वेळी DRPPL प्रशासनाने पोलिस उपायुक्त परिमंडळ ५ यांना निरोप पाठविला की दिनांक १२ सप्टेंबर रोजीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम DRPPL ने रद्द केलेला आहे सबब धारावी बचाव आंदोलनाने उपोषणाचा कार्यक्रम आटोपता घेऊन १२ तारखेचे आंदोलन रद्द करावे. DRPPL ने दिलेली माहिती आणि पोलिसांची विनंती यांना मान देऊन धारावी बचाव आंदोलनाने उपोषणाचा तसेच १२ तारखेच्या आंदोलनाचा कार्यक्रम स्थगित केला होता.

DRPPL ने आज उरकलेला भूमिपूजनाचा कार्यक्रम म्हणजे चोरी-चोरी चुपके-चूपके कार्यक्रम आहे. सदरच्या भूमिपूजन कार्यक्रमाला नगरसेवक, आमदार, खासदार असे लोकप्रतिनिधी, धारावीतील प्रतिष्ठित नागरिक, धार्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी असे कोणीच उपस्थित नव्हते. सदरचे भूमिपूजन कोणाच्या हस्ते झाले? व या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होते? अशी कोणतीही माहिती DRPPL ने जाहीर केलेल्या वृत्तपत्र निवेदनात नाही. एकंदरीत अदानीचा साराच कारभार हा चोरीचा मामला असण्याचाच प्रकार आहे.
इतक्या लबाडीने भूमिपूजन उरकणारा विकासक धारावीकरांशी प्रामाणिक राहून त्यांना धारावीतच घर देईल यावर विश्वास कसा ठेवायचा? चोराच्या मनात चांदणं, तसं अदानीच्या मनात BKC असल्यामुळे धारावीकरांना धारावीबाहेर मिठागराच्या आणि कचरापट्टीच्या जमिनींवर हुसकावून लावले जाईल ही भीती खरी ठरेल अशी संभावना आहे.