Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रएसटी महामंडळ प्रथमच १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयाने नफ्यात…!

एसटी महामंडळ प्रथमच १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयाने नफ्यात…!

मुंबई : गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला सुगीचे दिवस सुरु झाले असून एसटीची आर्थिक घोडदौड चालू आहे. ऑगस्ट महिन्यात ३१ विभागांपैकी २० विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा १६ कोटी ८६ लाख, ६१ हजार रुपये इतका नफा झालेला आहे. तब्बल ९ वर्षांनी, ऑगस्ट-२०२४ मध्ये एसटी महामंडळ नफ्यात आल्याने मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यात देखील प्रयत्नांची पराकाष्टा करून महामंडळ सातत्याने फायद्यात येईल असे प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे.
दोन वर्ष कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एस टी महामंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते. एसटी बंद पडते की काय? अशी अवस्था निर्माण झाली होती. मे २०२२ पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. तथापि, एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. यावेळी राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, की ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. सध्या सरासरी ५४ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत.
याबरोबरच एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात ” हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान”, विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्या मध्ये आहेत, त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून, त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या. याच बरोबर नादुरुस्ती बसेसचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेमध्ये निम्याने कमी करण्यात आले. ते १२% वरुन ६% आणण्यात आले. तसेच चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांचे सातत्याने प्रबोधन करुन डिझेलची खपत ०.५२ कि.मी.ने वाढविण्यात आले. त्यामुळे डिझेलची बचत झाली आहे. या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिपाक म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये एसटी महामंडळाला १६ कोटी, ८६ लाख, ६१ हजार इतका नफा प्राप्त झालेला आहे.
भविष्यात येऊ घातलेल्या स्व: मालकीच्या बसेस व भाडेतत्वावरील बसेस एसटीच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर त्याचा योग्य विनियोग करुन एसटी महामंडळ सातत्याने फायद्यात राहील यासाठी कृतीशील आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल जेणेकरुन एसटीला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments