मुंबई (प्रतिनिधी) : आजकाल मोबाईल गेमच्या विळख्यात तरुणांपासून ते लहान मुले अडकली आहेत त्यामुळे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. तरुणांनी व लहान मुलांनी मैदानी खेळाकडे आकर्षित व्हावे व एक धाव आरोग्यासाठी असा मौलिक संदेश देणारी संकल्पना कुर्ला कामगार नगर सार्वजनिक गणेशोत्सवात साकारण्यात आली आहे . या सजावटीमध्ये क्रिकेट , फुटबॉल या खेळांचे देखावे करण्यात आले आहेत. जेणेकरुन तरुण व लहान मुले मोबाईल गेमच्या विळख्यातून बाहेर पडून मैदानी खेळाला प्राधान्य देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सिनियर क्रिकेट क्लबचे विश्वस्त श्री. सुधीर गावडे, श्री गजानन वाविकर , श्री. राजू देसाई, श्री नयन तळवडेकर तसेच उत्सव समिती चे श्री. सिध्दार्थ कारंडे, पुरुषोत्तम पवळे, निखिल तारकर, प्रथमेश तारकर, रोशन देसाई, ओंकार पाचलग, अमोल परब, प्रथमेश तारकर, गौरव परब , उमेश सावंत या तरुणांनी अपार मेहनतीने हा देखावा साकार केला आहे. तसेच विविध क्रीडा स्पर्धा जिंकलेले चषकही या सजावटीत मांडण्यात आले आहेत. मोबाईल मुळे झपाटलेल्या पीढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन या सजावटीने घातले आहे.
