प्रतिनिधी : शहरातील बेघर, निराश्रित नागरिकांना निवारा मिळावा यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 15 मार्च 2024 पासून प्लॉट क्रमांक २४०, सेक्टर ४, घणसोली येथे बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. या बेघर निवारा केंद्राची इमारत तीन मजली असून याठिकाणी १०३ लाभार्थी राहू शकतात एवढी क्षमता आहे. तीन मजल्यांपैकी पहिला मजला पुरुषांसाठी, दुसरा मजला महिलांसाठी तसेच तिसऱ्या मजल्यावर कुटुंबांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निवारा केंद्राव्दारे नागरी बेघरांना निवारा या घटकामध्ये रस्त्याच्या कडेला व उघड्यावर कोणत्याही प्रकारचा निवारा नसलेल्या बेघर व्यक्तींसाठी सुविधा दिली जाते. तसेच बेघरांचे वेळोवेळी समुपदेशन करण्यात येते. यामध्ये त्यांना बेघर निवारा केंद्राविषयी माहिती देऊन त्यांच्या इच्छेनुसार बेघर निवारा केंद्रात आणले जाते. जे बेघर आहेत अशा लाभार्थ्यांना निवारा केंद्रामध्ये वैद्यकीय सेवा, चहा, नाश्ता व जेवण, आंघोळीसाठी गरम पाणी, पिण्यासाठी शुध्द् पाणी, मनोरंजनाची सुविधा अशा सर्व सेवा निःशुल्क उपलब्ध करून दिल्या जातात. सदर बेघर निवारा केंद्र नवी मुंबई शहर महानगरपालिकेच्या वतीने आस्था सामाजिक विकास सेवा संस्थेमार्फत चालविले जात आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रस्त्यावर बेघर व्यक्ती (वृद्ध, महिला, मुले, दिव्यांग) आढळून आल्यास त्यांची माहिती श्री.तुषार पवार यांना मोबाईल क्रमांक ९८८१६३६१६८ तसेच श्री.राहुल वाढे यांना मोबाईल क्रमांक ८६६९३९३३०९ यावर देण्यात यावी असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
