मुंबई (रमेश औताडे) : गेल्या काही महिन्यांपासुन महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला दिसुन येत आहे. मागील दिड वर्षामध्ये तीन मंत्री पाहिलेल्या या विभागामध्ये काही महिन्यांपासुन भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विभागातील महत्वाच्या पदांवर बिनबोभाट नियमबाह्य नियुक्त्या दिल्या जात आहेत. असा आरोप मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ” माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन ” चे जयराज कोळी यांनी केला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन कारवाई झालेल्या महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबन कारवाई नंतर पुन्हा सेवेत येताना त्यांना महसुल विभागाऐवजी दुसऱ्या विभागामध्ये नियुक्ती देणे बंधनकारक असताना त्यांना पुन्हा महसूल विभागात नियुक्ती केले असून भरारी पथकाचा प्रमुख म्हणुन नेमण्यात आले असल्याचे पुरावे माहिती अधिकारात उघड झाले आहे असे कोळी यांनी सांगितले.
अन्न व औषध विभागानेच लावलेल्या गुटखा बंदी मध्ये विभागाचाच एक अधिकारी गुटखा तस्करीमध्ये अडकला आहे. विभागानेच त्या अधिकाऱ्याची विभागिय चौकशी सुरु करुन त्याला निलंबित केले, त्यानंतर काही महिन्यातच त्या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले आणि त्या अधिकाऱ्याला औरंगाबाद विभागामध्ये नियुक्ती देण्यात आलेली आहे, ही बाब म्हणजे चोरालाच चौकिदार बनविण्याची आहे.
त्यामुळे या सर्व प्रकरणी योग्य ती कारवाई झाली नाही तर फेडरेशन न्यायालयात जाईल असा इशारा कोळी यांनी यावेळी दिला.