सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील तमाम फुले — आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी स्मृती स्थान असणारे माता भिमाबाई आंबेडकर स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. स्वतः सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत तातडीची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला आहे.
सामाजिक न्याय विभागाचे या पुढे महा माता भिमाई स्मारकाच्या कामासाठी नियंत्रण राहिल व स्मारकाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येईल. स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत निधी आणण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
माता भिमाई आंबेडकर यांचे सातारा येथील स्मारकाच्या अपूर्ण कामाबाबत आढावा घेण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, यांच्यासह माता भिमाबाई आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य आणि आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते अशोक गायकवाड, प्राध्यापक अरुण गाडे ,अमर गायकवाड, संजय गाडे व मधुकर आठवले आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
माता भिमाबाई आंबेडकर यांचे स्मारक हा विषय सातारा जिल्ह्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे .गेल्या अनेक वर्षा पासून हे स्मारक रखडले होते. याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते ऋषिकेश गायकवाड, अमर गायकवाड व मान्यवरांनी उपोषण केले होते. मंत्रालय पातळीवर हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते भीमराव सावतकर यांच्या विंनती वरून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केलेला आहे. ही बाब सुद्धा आंबेडकर अनुयायांसाठी आनंदाची आहे. अशी आंबेडकरी कार्यकर्त्यांची भावना आहे.
या स्मारकचे बांधकामचे थोडे फार काम झाले आहे. हे काम जुने असून याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येईल. ज्या जागेवर माता भिमाबाई आंबेडकर अंत्यविधी झाला आहे त्याच ठिकाणी स्मारक उभारण्यात येईल. माता भिमाबाई आंबेडकर यांचे स्मारक हा विषयक गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे. ते तातडीने स्मारक उभारणीसाठी स्थानिक समितीने शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत केले.
पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे सातारा जिल्ह्यातील काही आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्वागत करुन आभार मानले. दरम्यान, महामाता भिमाई स्मारक व्हावे .यासाठी तात्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेब यांनी ९ मे १९८९ साली साताऱ्यातील भिमाई स्मारकाच्या या जागी भेट देऊन दोन लाख ५७ हजार रुपये निधी देण्याचे जाहीर केला होता. यावेळी मुंबईचे माजी नगरसेवक आर . एन चव्हाण मास्तर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. आता ते सध्या हयात नाहीत.
त्यानंतर या स्मारकाच्या कामाला काँग्रेसचे तात्कालीन महसूल मंत्री विलासराव देशमुख यांनी स्थगिती दिली होती. तेव्हापासून हे काम रखडले असल्याची माहिती साताऱ्यातील जुने जाणते कार्यकर्त्यांनी सांगितले. आता महायुती सरकारने पुन्हा एकदा या भिमाई स्मारकांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. सदर जागेची नोंद ही डोक म्हणजेच स्मशानभूमी अशी फार पूर्वी करण्यात आली होती. त्याचे कागदपत्र अस्तित्वात आहेत.
साताऱ्यातील महामाता भिमाई स्मारकाला गती देण्यासाठी प्रयत्न – पालकमंत्री शंभूराज देसाई
RELATED ARTICLES