प्रतिनिधी : धारावी पुनर्विकासाची कोणतीही ब्लूप्रिंट जाहीर न करता येत्या दिनांक :१२ सप्टेंबर,२०२४ रोजी माटुंग्यातील आरपीएफ मैदानात धारावी पुनर्वसनाचे भूमिपूजन करण्याच्या घाट घालणाऱ्या अदानी समूहाविरोधात धारावी बचाव आंदोलन समिती चांगलीच आक्रमक झाली असून भूमिपूजन उधळून टाकण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. या निषेध आंदोलनामुळे अदानीविरोधातील संघर्ष आणखीन वाढण्याची शक्यता निर्माण झाली असताना धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक व कार्यकर्ते आंदोलनाच्या एक दिवस आधी भूमिपूजनाच्या जागेपासून हाकेच्या अंतरावर साखळी उपोषणाला बसतील अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार बाबुराव माने यांनी केली आहे . या घोषणेमुळे अदानी समूहाच्या डीआरपीपीएल कंपनीची डोकेदुखी मात्र चांगलीच वाढण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी धारावी पुनर्वसनासाठी माटुंग्यातील आरपीएफ मैदानात दिनांक :१२ सप्टेंबर,२०२४ रोजी भूमिपूजन करण्याची घोषणा डीआरपीपीएलने केली. या अजब घोषणेमुळे धारावीकर संतापला असून धारावीकरांच्या मागणीबाबत कोणताही विकास आराखडा जाहीर नसताना डीआरपीपीएल कंपनी धारावी पुनर्वसनाचे भूमिपूजन कसे काय करू शकते. यावर समस्त धारावीत तिखट प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार बाबुराव माने म्हणाले जोपर्यंत डीआरपीपीएल धारावी बचाव आंदोलनाने केलेल्या मागण्याबाबत आपले चित्र स्पष्ट करत नाही, तोपर्यंत धारावी पुनर्वसनाचे भूमिपूजन ते कसं काय करू शकतात हि निव्वळ फसवेगिरी सुरु झाली असून मोकळ्या जागेत इमारती बांधून एखाद्या गावठाणासारखा धारावीचा विकास ते करू पाहत आहेत. या जागेत उंचच उंच टॉवर बांधून धारावीकरांना आपल्या मोहपाशात अडकविण्याचा डाव डीआरपीपीएलने सुरु केल्याचा आरोप करत त्यांनी अदानी समूहाच्या फसवेगिरीचा चांगलाच समाचार घेतला. दिनांक :११ सप्टेंबर ,२०२४ रोजी होणाऱ्या साखळी उपोषणात धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक माजी आमदार बाबुराव माने, शेकापचे नेते राजेंद्र कोरडे, साम्या कोरडे, भाकप नेते नसीरुल हक, राष्ट्रवादीचे (एसपी) नेते उल्लेश गजाकोश,काँग्रेसचे सुभाष पाखरे, वंचित नेते अनिल कासारे, सपा नेते अशफाक खान, बसपा नेते श्यामलाल जैस्वार आणि आपचे नेते ॲड. संदीप कटके, पॉल राफेल, अयुब खान, सीपीआयएम नेते शलेंद्र कांबळे, एम. ऍश सेलवन, समन्वयक संजय भालेराव, शिवसेना पदाधिकारी साईनाथ धुर्वा,विभागप्रमुख महेश सावंत,धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार आणि ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश सावंत, धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने बिझनेसमन असोसिएशनचे अबू खालिद अंजुम, तंजीम-ए-इन्साफचे इस्तियाक अहमद नूरी, अब्दुल्ला शेख, एआयवायएफचे हसन पठाण सहभागी होणार आहेत. तर दिनांक :१२ सप्टेंबर,२०२४ रोजी होणाऱ्या निषेध आंदोलनात स्थानिक खासदार अनिल देसाई, खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
