तळमावले/वार्ताहर : स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी अपडेट रहावे. सर्वत्र क्षेत्रांमध्ये सध्या प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुणवत्ता महत्त्वाची आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले. ते पाटण तालुका कराड रहिवाशी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या 12 व्या वर्धापन दिन आणि गुणवंत पाल्य पुरस्कार सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, डाॅ.दिलीपराव चव्हाण, विजय पवार, पंजाबराव देसाई, मंडळाचे अध्यक्ष अॅड.मिलींद पाटील, सचिव शंकर पाटील, खजिनदार आप्पासाहेब मगरे, कार्याध्यक्ष शंकर देसाई, सदस्य राजेंद्र जाधव, राहुल देसाई, रफिक पटेल, बाळकृष्ण काजारी, प्रा.उत्तमराव माने, दिलीपराव जानुगडे, प्रकाश तवटे, संग्राम मोकाशी, एडवोकेट संग्राम निकम, नवनाथ पालेकर, रणजीत पाटील, विजय शिंदे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व.शिवाजीराव देसाई यांच्या प्रतिमांचे पुजन ना.देसाई व अन्य मान्यवर यांच्या हस्ते झाल्यानंतर दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्वक मेहनत, जिद्द आणि चिकाटी ठेवून आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. शालेय आणि काॅलेज जीवनात आपली स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. दौलतनगर येथील स्पर्धा परीक्षा केंद्रामधील चव्वेचाळीस मुले यशस्वी ठरली आहेत. यापैकी बेचाळीस मुलांना भुकंपग्रस्त दाखल्याचा लाभ मिळाला आहे. भूकंप दाखल्यातील त्रुटी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही मोठे सहकार्य लाभले आहे.
यावेळी पाटण तालुक्यातील असलेले परंतू सध्या कराड येथे वास्तव्यास असलेल्या इ.पाचवी ते पदवी पर्यंतच्या परीक्षेत सत्तर टक्केपेक्षा जास्त गुणप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा ना.शंभूराज देसाई आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, बक्षीस देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मोठया संख्येेने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी श्री.उत्तमराव माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.मिलिंद पाटील यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.दीपक तडाखे यांनी तर आभारप्रदर्शन आप्पासाहेब मगरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाटण तालुका कराड रहिवाशी मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

चौकटीत : विद्यार्थ्यांबरोबर अन्य क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिंचा गौरव
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या बरोबरच अन्य क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या अन्य व्यक्तिंचा गौरव करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचा शेतीमित्र पुरस्कार जाहीर झालेले डाकवे, नृत्यांगणा ऐश्वर्या कदम, व अन्य व्यक्ती यांचाही ना.शंभूराज देसाई व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरव केला. ना.देसाई यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे यावेळी जाहीर कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.