सातारा(अजित जगताप) : जागतिक दर्जाच्या पर्यटनामुळे नावलौकिक प्राप्त केलेल्या कास पुष्प पठार अजून फुलला नाही तरीही व्यवसायिक व काही प्रशासकीय कारभाराने फुल नाही तरीही सोहळा गुलशन गुलशन.. असा प्रकार सुरू झालेला आहे. त्यामुळे निराशा टाळण्यासाठी जाणकार व अभ्यासू पर्यटकांनी योग्य व अचूक माहिती घेऊन पर्यटनाला यावे. अशी मागणी होऊ लागलेली आहे. ३०-३५ वर्षांपूर्वी मन मुराद आनंद लुटणाऱ्या पर्यटकांनी या वास्तूचे कौतुक केले. त्यानंतर या जागतिक पर्यटन दर्जा मिळालेल्या या पुष्प पठाराला व्यवसायिकांची नजर लागली. त्यामुळे मार्केटिंग फंड सुरू झाल्यामुळे स्थानिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. आज मोकळा श्वास घेणाऱ्या कास पुष्प पठार आता ूर्वी तार्याच्या कुंपणाने वेढले गेले होते. आता त्या ठिकाणी प्लास्टिक अच्छादन टाकण्यात आलेले आहे. पूर्वी मुबलक प्रमाणात या ठिकाणी विविध रंगाची विविध ढंगाची बेसुमार फुलं उमलत होती. आता त्याचे प्रमाण अवघ्या तीस ते पस्तीस टक्के पर्यंत आलेले आहे. वैज्ञानिक व नैसर्गिक दृष्ट्या पूर्वी स्थानिक भूमिपुत्र शेती करत होते व त्यांची पाळीव जनावरे या ठिकाणच्या गवत खाऊन व शेणखताचा मारा करून येथील निसर्गरम्य परिसराला जीवदान देत होते. आता या परिसरामध्ये जनावरांचे प्रमाण कमी झालेले आहे. त्याचबरोबर स्थानिकांचे सुद्धा प्रमाण कमी होत आहे. ही फार मोठी चिंतेची बाब आहे. एखाद्या निसर्गरम्य परिसरामध्ये पर्यटकांना फार तर जास्तीत जास्त दोन दिवस फिरण्याचा आनंद मिळतो. त्यानंतर त्यांना कंटाळा येतो परंतु, येथील गरीब, कष्टकरी, शेतमजूर, शेतकरी व स्थानिक भूमिपुत्रांनी या ठिकाणची नैसर्गिक साधनसामग्री जपण्यासाठी आपल्या अनेक पिढ्या घालवले आहेत. येथील मातीशी नाळ जोडलेली आहे. ऊन- वारा- पाऊस- वादळ वाऱ्याशी सामना करत या ठिकाणचे निसर्ग टिकवलेले आहे. आज काही व्यवसायिक स्थानिक भूमिपुत्रांचे कष्ट व श्रम कमी मोबदल्यात विकत घेऊन स्वतःचे बंगले बांधून त्या ठिकाणी राहत आहेत. काही स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही. त्यांच्या हक्काच्या रोजगारावर गदा आलेली आहे. परंतु, सध्या सातारा जिल्ह्यामध्ये मुठभर व्यावसायिक आणि निव्वळ लाभार्थी काही प्रशासकीय अधिकारी यांच्या युतीमुळे सामान्यांचा आवाज दाबला जात आहे. खरं म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे ब्रीद वाक्य या परिसरातील प्रत्येकाने आपल्या अंगणात सिद्ध करून दाखवलेले आहे. याउलट काही राजकीय आश्रेयदाते यांनी बेसुमार वृक्षतोड करून आपले व्यावसायिक इमले बांधत आहेत. त्यामुळे खरोखरच जर कास पठारावर पुष्प व फुलं उमलत असतील तर नक्कीच हौशी पर्यटकांनी व निसर्गप्रेमींनी यावे. अन्यथा आपले पैसे बुडण्याचे व आपली फसवणूक झाल्याची तक्रार नंतर मात्र करू नये. अशी विनंती स्थानिक भूमिपुत्रांनी केलेली आहे. वास्तविक पाहता आजच्या तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात फुल अजून डोळ्याला दिसावी इतकी आलेली नाहीत. तरी फुलं नसताना सुद्धा सोहळ्याचा गुलशन गुलशन उभा करण्यामध्ये वाटेकरी कोण? याचाही आता माहितीच्या अधिकारात शोध घेतला जात आहे. याची नोंद आता संबंधितांनी घ्यावी .असा इशारा देण्यात आलेला आहे. वेग वेगळी फुले उमलली…. रचुनी त्यांची झेले… गेले ते दिन गेले… असा आता सूर येथील निसर्गरम्य परिसरात ऐकण्यास मिळत आहे.
