वडूज(अजित जगताप) : सध्या प्रशासकीय कारभार असल्यामुळे सरकार करेल तीच पूर्व दिशा या गोष्टीला छेद देण्याचे काम लाडक्या बहिणीनेच करून दाखवलेले आहे. घोटाळा साताऱ्यात पण खारघर मध्ये तो उघड झाल्यामुळे चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. वडूज पोलीस ठाण्यात या गुन्ह्याबाबत दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता दिनांक ६ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
याबाबत माहिती अशी की राज्य शासनाने तीन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित करून सर्वसामान्य महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याची योजना पूर्ण महाराष्ट्रात राबवली. त्याचा इव्हेंट मॅनेजमेंट सातारा जिल्ह्यातील केला होता. लाडक्या बहिणीने भावांना राखी बांधून त्याबद्दल धन्यवाद दिले होते. आता मात्र सातारा जिल्ह्यातील घाडगे मळा, निमसोड तालुका खटाव याच ठिकाणी गणेश संजय घाडगे वय ३० व प्रतीक्षा पोपट जाधव व २२ यांनीच या योजनेतून एक नव्हे तर तब्बल २८ वेगवेगळ्या आधार कार्ड वर स्वतःच्या मोबाईल लिंक वरून अर्ज भरल्याचे वडूज पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी तपासात उघड केले .याबाबत पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू केलेले आहे. या योजनेतून सुमारे पाच लाख महिलांची नोंदणी झाली होती . त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळे सरकारने याचं चांगलेच क्रेडिट घेण्यासाठी सुमारे २०० कोटी रुपये खर्च केले. पण जो बूँद से गई व हौद से नही आती… याची प्रचिती पाहण्यास मिळाली.
नवी मुंबई खारघर येथील एका जागृत महिलेने तक्रार करून हा प्रकार उघडकीस आणला. खारघर मधील पूजा महामुने यांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज करायचा होता. परंतु, त्यांचा अर्ज भरला जात नव्हता. याबाबत दस्तुरखुद भाजपच्या माजी नगरसेवकांनी तक्रार केली .आणि या तक्रारीनंतर हे सर्व प्रकरण साताराचे असल्याचे समोर आले. त्यानंतर साताऱ्याचे गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक अरुण देवकर , वडूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी या प्रकाराची चौकशी केल्यानंतर या दाम्पत्यांनी अर्ज भरल्याचे समोर आले आहे. हे अर्ज भरण्यासाठी कोमल संजय पिसाळ, सुनंदा संजय पिसाळ, मंगल संजय घाडगे व पूजा बाळासाहेब जाधव यांच्या आधार कार्डचा उपयोग झाला. अन्य २५ आधार कार्डचा क्रमांक हा गुगल वर सर्च करून मिळवल्याचे चौकशीत समोर आले आहे. यातील अनेक आधार कार्ड पर प्रांतातील असल्याचे समोर आले आहे .
विशेष बाब म्हणजे माणदेशी महिला सहकारी बँकेच्या वडूज शाखेतील एकाच खात्यात ही लिंक करण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता माणदेशी महिला सहकारी बँकेचा कारभार पारदर्शक असताना हे असंच कसं काय घडले? याची आता चर्चा होऊ लागलेली आहे. सदर अर्ज भरताना प्रतीक्षा या महिलेने विविध गणवेश धारण करून फोटो काढल्यामुळेच ही बाब लक्षात आली नाही. याबाबत आता बालविकास प्रकल्प अधिकारी एस एस खाबळे यांनी वडूज पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक निरीक्षक विक्रांत पाटील हे करत आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती भविष्यात वाढू नये. यासाठी पुन्हा एकदा ही योजना सरकार पारदर्शकतेच्या नावाने थांबवण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
लाडक्या बहिणीला रक्षाबंधनला दिलेली ओवाळणी थांबवण्याची नामुष्की राज्य सरकारवर आल्याची टीका आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशात सदस्य सौ .समिंद्रा जाधव, श्रीमती नलिनी जाधव व सौ. पूजा गायकवाड व सौ. वैशाली जाधव व अनेक महिलांनी केलेली आहे. या सर्व प्रकाराचा दोष हा प्रशासकीय कारभार पाहणाऱ्यांच्याचआहेः त्यांच्यावर नेमकी कधी कारवाई होणार ?याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. चांगले झाले तर आम्ही केले आणि वाईट झाले तर दुसऱ्याच्या माथी खापर फोडण्याचा प्रकार आता उघडकीस आलेला आहे.
लाडकी बहीण घोटाळा साताऱ्यात… पण उघड झाला खारघरला
RELATED ARTICLES