मुंबई- कराड तालुक्यातील बामणवाडी या आदर्श गावातील ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची वार्षिक यात्रा गुरुवार ११ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.त्यानिमित्त सर्व ग्रामस्थांच्यावतीने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू झाला आहे.
यंदाच्या पारायण सोहळ्यामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रातील सोशल मीडियावर गाजत असलेल्या प्रसिद्ध आठ नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा भाविकांना लाभणार आहे. सध्या दररोज काकड आरती,हरिपाठ,ज्ञानेश्वरी वाचन आणि कीर्तन कार्यक्रम सुरू आहेत. मंगळवार ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी पारायणाची सांगता आणि माऊलींच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर बुधवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त नैवेद्य आणि फटाक्यांची आतषबाजी तसेच रात्री लोकनाट्य तमाशा होणार आहे. तसेच गुरुवार ११ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता लक्ष्मीदेवीची पालखी मिरवणुक आणि सायंकाळी जंगी कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे. तरी परिसरातील भाविकांनी या पारायण आणि यात्रा सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणेश व नवरात्रोत्सव मंडळ,श्री शिवशंभो मित्र मंडळ,मुंबई आणि बामणवाडी ग्रामस्थ मंडळातर्फे करण्यात आले आहे.