मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात अनेक पालक आपल्या मुलाबाळांसह गावाकडे जात असतात, त्यामुळे या काळात विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याची मागणी जनता दल (से) महाराष्ट्र पक्षाने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
यावर्षी गणपतीचे आगमन ७ सप्टेंबर रोजी होत असून अनंत चतुर्दशी (विसर्जन ) १७ सप्टेंबर रोजी आहे. कॉन्व्हेन्ट शाळा वगळता बहुतेक शाळांना पहिले पाच दिवस म्हणजे ११ तारखेपर्यंत सुट्टी आहे. तसेच १५ (रविवार), १६ (ईद) व १७ तारखेला अनंत चतुर्दशी निमित्त सुटी आहे. सीबीएसई शाळांमध्ये तर शनिवार १४ सप्टेंबर रोजीही सुटी आहे. त्यामुळे अनेक पालकांनी सलग सुट्टया गृहित धरून बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले आहे. मात्र, काही शाळांमध्ये नियमावर बोट ठेवून, १२ व १३ तारखेला एक वा दोन विषयांची परीक्षा होणार आहे.
विरार, बोळींज येथील मुलजीभाई मेहता इंटरनॅशनल स्कूल या शाळेत १३ तारखेला एका विषयाची परीक्षा असून नंतर १४, १५, १६ व १७ सप्टेंबर असे सलग चार दिवस शाळेला सुट्टी आहे. त्यामुळे केवळ एकच पेपर १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.
यामुळे गणपतीच्या काळात बाहेरगावी जाणाऱ्या पालकांची व त्यांच्या पाल्यांची अडचण होणार आहे. बाहेरगावी जाणारे पालक आपल्या येण्या-जाण्याच्या रेल्वे व बसच्या तिकिटाचे आगाऊ बुकिंग करून ठेवतात. त्यातच गणेशोत्सवाच्या काळात सर्वच गाड्यांना गर्दी असल्यामुळे ऐनवेळी पालकांना तिकिटे मिळणार नाहीत. त्यामुळे त्यांची अडचण होणार आहे.
या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवानंतरच परीक्षांचे नियोजन करण्याच्या सूचना विरार येथील मुलजीभाई मेहता इंटरनॅशनल स्कूलसह सर्व शाळांना द्याव्यात, अशी विनंती जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रवक्ते प्रभाकर नारकर यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळातपरीक्षा न घेण्याचीजनता दलाची मागणी
RELATED ARTICLES