मुंबई – गणेशोत्सवापर्यंत कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांचा टोल माफ करावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

दरवर्षी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या भागातून लाखो गणेशभक्त कोकणातील गणेशोत्सवासाठी आपल्या मुळ गावी जातात. यावर्षी दिनांक ७ सप्टेंबर, २०२४ रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे साधारणः दिनांक ४ सप्टेंबर, २०२४ पासून कोकणातील गणेशभक्त हे आपल्या मूळ गावी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने निघणार आहेत.
त्यामुळे शासनाने दिनांक ४ सप्टेंबर, २०२४ पासून ते संपूर्ण गणेशोत्सवापर्यंत कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांना टोल माफी करण्याची त्वरीत कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.