मुंबई (रमेश औताडे) : वाढत्या लैंगिक गुन्ह्यांच्या प्रवृत्तीमागील समाजाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. असे मत वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया चे राज्य अध्यक्ष शेख अब्दुल रहमान यांनी महिला सुरक्षा व वाढते बलात्कार या परिसंवादात व्यक्त केले.

बदलापूर येथील शाळेत चिमुकल्यांचा विनयभंग शाळेच्या आवारातच एका कर्मचाऱ्याने केला, कोलकाता येथील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येनंतर हे संकट देशभर पसरत चालले आहे. हि चिंताजनक बाब आहे. असे यावेळी मोहम्मद शेख यांनी सांगितले. शैक्षणिक संस्था आणि कामाच्या ठिकाणी आपल्या मुली आणि भगिनींच्या सुरक्षेची खात्री करू शकत नसलो, तर ती एक अतिशय गंभीर समस्या होऊ शकते. असे डॉ फरिदा अक्कतर यांनी सांगितले.
समाजातील नैतिक ऱ्हास आणि वैयक्तिक चारित्र्यातील झालेली घसरण यावर समाजातील सर्व घटकांनी चिंतन करण्याची गरज आहे.याकूब शेख यांनी सांगितले. नेत्यांनी हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचे राजकारण सोडून तरुण पिढीला लैंगिक विकृती आणि नैतिक भ्रष्टाचाराच्या खाईत लोटण्यापासून वाचवण्यावर भर दिला पाहिजे. असे रियाज खान यांनी यावेळी सांगितले. समाज आणि सरकारला शाळांमध्ये नैतिक शिक्षण पुन्हा सुरू करण्याचे आणि चारित्र्यनिर्मितीला प्राधान्य देण्याचे आवाहन इरफान खान यांनी केले.
मुख्य प्रवाहातील माध्यमे, सोशल मीडिया आणि मनोरंजन उद्योगात प्रचलित असलेली असभ्यता आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत नियंत्रण करण्याची गरज आहे असे इब्राहिम शरीफ म्हणाले.