सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहरात अनेक विधायक उपक्रम राबवण्यात आले. त्याचे सातारकरांनी मनापासून स्वागत केले. आरोग्याची काळजी घेण्यासाठी धावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण, या स्पर्धा मोकळा रस्ता व मैदान असलेल्या माण -खटावच्या दुष्काळी भागात झाल्या तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. या स्पर्धा कास पठाराच्या मार्गावर होत असल्याने हौशी धावपटू व मॅरेथॉन पटू धावणार पण स्थानिकांचे रोजगार काही काळासाठी थांबणार? अशी खंत स्थानिक भूमिपुत्र व्यक्त करू लागलेले आहेत. त्याकडे आता महाराष्ट्रातील गरिबांसाठी लढणाऱ्या संघटनेनेच आवाज उठवावा अशी मागणी पुढे आलेली आहे. रोजगार बुडत असल्याने गरिबांना निराशा पोटी आपापल्या घरट्यात पळावे लागत आहे. याची मात्र कुणीही जबाबदारी घेताना दिसत नाही. अशी खंत ग्रामीण भागातील गोरगरीब कष्टकरी व्यक्त करत आहे. रामायणामध्ये श्री प्रभू रामचंद्र यांचा १४ वर्षांनी वनवास थांबला होता. आता या मॅरेथॉन स्पर्धेचे तेरावे वर्ष असून सलग तेरा वर्ष स्थानिक भूमिपुत्र व रोजगारासाठी सातारा शहरात येणाऱ्या अनेकांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. कारण, या स्पर्धा जरी खाजगी व्यक्ती आयोजित करीत असले तरी शासकीय लाल कार्पेट टाकून त्याला मुलायमा दिला जात आहे. सातारा जिल्हा प्रशासन जर मॅरेथॉनच्या नावाखाली कायदे व नियम धाब्यावर बसवत असेल तर सामान्यांनी दाद कुणाकडे मागावी ?असाही प्रश्न काहींनी विचारलेला आहे. सातारा जिल्ह्यात हौशी धावपटू व मॅरेथॉन पटू यांच्यासाठी धावण्याची स्पर्धा भरवणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे आरोग्याची निगा व काळजी घेतली जाते. याबद्दल कोणाचेही दुमत असल्याचे काही कारण नाही. दिनांक १ सप्टेंबर २०२४ म्हणजे रविवार हा दिवस सातारच्या दृष्टीने बाजाराचा दिवस असल्यामुळे परळी , सज्जनगड, ठोसेघर, कास अंधारी, बामणोली, पिलाणी, यवतेश्वर व ग्रामीण भागातून अनेक जण डोंगर दरी पायपीट करून जीवनावश्यक वस्तू व धान्य, फळे, भाजीपाला व इतर वस्तू विक्रीसाठी साताऱ्यात आणतात. आणि त्याच्या बदल्यात आठवड्याचा बाजार घेऊन ते परत आपापल्या घरी जातात. आता या मॅरेथॉन स्पर्धेमुळे त्यांची दरवर्षीच अडवणूक होताना दिसत आहे. असं काही स्थानिक ग्रामस्थांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. याबाबत प्रसारमाध्यमही आवाज उठवत आहे ही सुखद बाब असली तरी सध्याच्या काळामध्ये सर्वच गोष्टी ही रेटून घेऊन जातात. त्यामुळे या मॅरेथॉन स्पर्धेला सुद्धा अपवाद नाही. यातून होणारे आर्थिक लाभ हे विशिष्ट वर्गाकडे जात आहे. मात्र, या भागातील रस्त्याच्या डागडूजीसाठी कार्यकर्त्यांना आंदोलन करावे लागते. गोरगरीब व कष्टकरी आणि हातावर पोट असणारे स्थानिक भूमिपुत्र मात्र आपला रोजगार बुडाला आपल्याला आज रोजगार मिळू शकला नाही किंवा जो मिळाला तो कमी प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या प्रश्नाला दुय्यम समजणाऱ्यांना गरिबाच्या पोटाची भूक काय कळणार? सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्यांना मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे जीवनामरणाचा प्रश्न वाटत आहे. दुसऱ्या बाजूला निकृष्ट दर्जाच्या रस्त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे कार्यकर्ते यांना संघर्ष करावा लागत आहे. मॅरेथॉनचे आयोजक किंवा प्रसारक वगळता जनतेसाठी रस्त्यावर उतरणारे हे खरे धावपटू समाजासाठी धावतात. अशा वेळेला आपापल्या आलिशान बंगल्यात बसणारे कधीही रस्त्यावर उतरत नाहीत. त्यांच्याबाबत आता जनतेने उठाव करावा. अशी मागणी पुढे आलेले आहे. याचा आता जिल्हा प्रशासनातील अधिकारी केव्हा विचार करणार? असा मार्मिक प्रश्न बाजारासाठी येणाऱ्या वयोवृद्धांनी विचारलेला आहे. दरम्यान, याबाबत मॅरेथॉन स्पर्धा आयोजकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची सत्य बाजू समजू शकली नाही. ……………………………… ………………..
चौकट- मॅरेथॉन स्पर्धेला कधीही विरोध नाही. परंतु या स्पर्धेमुळे गोरगरिबांच्या रोजगार बुडू नये. हीच अपेक्षा आहे. विरोधाला विरोध नसून गरिबांना एका दिवसाच्या रोजगाराचे पैसे उपलब्ध करून देणे. इतके मोठे मन मॅरेथॉन स्पर्धा आयोजकांनी करावे आणि खुशाल या स्पर्धा भरवाव्यात असे काहींनी म्हटले आहे.
