सातारा (अजित जगताप) : ज्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था पाळली जात नाही. असे ठिकाण म्हणजे सातारा शहर आहे. हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही परंतु, आता जागरूक नागरिक व पत्रकारानीच आवाज उठवल्यामुळे विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्या करणाऱ्यांना कायद्याचीच आठवण करून देणारी इंगळी डसली आहे . याबाबत माहिती अशी की, सध्या सातारा शहर व परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तयारीला लागली आहे. मोठ्या प्रमाणात श्री गणरायाच्या आगमनापूर्वीच भव्य दिव्य मंडप उभारणीचे काम होत आहे. या कामासाठी अकुशल कारागीर व मंडप मालक साताऱ्यात कोणतीही परवानगी नसताना दस्तूर खुद्द सातारा नगरपालिकेने लावलेले वृक्ष तोडण्याचे राजेरोस काम करत आहेत. सदर सातारच्या पर्यटन व पर्यावरणावर हानी करणाऱ्या या प्रवृत्ती विरोधात आता एका जागरूक पत्रकारच आवाज उठवू लागले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी पत्रकारितेवर शेरे मारणारे आता मूग गिळून गप्प का आहेत? त्यांना सातारा नगरपालिकेचेसर्व कागदावरील वृक्षतोड प्रेमी व पर्यावरण प्रेमी दिसत नाहीत का? असा आता सवाल जेष्ठ नागरिक विचारू लागलेले आहेत .
वृक्षवल्ली आम्हा… सोयरे वनचरे… असं संत महात्म्यांनी लिहून ठेवले होते. त्यांचा आदर्श घेणाऱ्या सातारकरांना याचा नेमका रस्त्यावर वृक्षतोडीबाबत विसर कसा पडला? असा आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच रस्त्यावर महायुतीच्या सत्ताधारी पक्षाचे कार्यालय असून त्यांना सुद्धा याची साधी खंत वाटत नाही. याचा आता कुणालाही नवल वाटू नये. अशी राजकीय स्थिती आहे. काल दुपारी सातारा शहरातील पोलिस मुख्यालय ते शिवतीर्थ पोवई नाक्या मार्गावर रस्त्यावरील एका बिल्डिंग शेजारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपासाठी ही वृक्षतोड होत होती . असे दिवसाढवळ्या घडत असताना जागरूक पत्रकाराने धाडस दाखवून हे कृत्य थांबवले. त्यामुळे एक झाड वाचवण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी लाभलेले आहे.
पत्रकारितेतील बातमी हा समाजाचा स्वच्छ व पारदर्शक आरसा असतो. पण बदलत्या परिस्थितीनुसार काही ठिकाणी आता त्याचा वक्र आरसा झाल्यामुळे प्रतिबिंब ही तसेच दिसते. असे स्पष्टपणे समाज माध्यमावर अनुभव येत आहे. सातारा शहर व परिसरात वाडवडिलांनी सावली व संरक्षणासाठी अनेक झाडे लावलेले आहेत. पण, सातारा नगरपालिकेनेच लावलेल्या झाडावर जर कोणी कोयता आणि कुऱ्हाड चालवत असेल तर सातारा नगरपालिका नेमकं करते काय? असाही प्रश्न आता विचारण्याची मानसिकता लोकांची झालेली नाही. सध्या प्रशासकीय कारभार असल्यामुळे एक हाती सत्ता एकवटली आहे .
सातारा शहरातील जनता ही फक्त मतदारापुरतीच मर्यादित राहिलेली आहे. याचा आता वरिष्ठ व प्रामाणिक अधिकाऱ्यांनी विचार करून संबंधितांवर कडक कारवाई करावी व साताऱ्यात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे हे नव्याने दाखवून द्यावे. अशी विनंती पर्यटन ज्येष्ठ नागरिक व काही प्रामाणिक पर्यावरण प्रेमींनी केलेले आहे. सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रदूषण वाढू लागल्याने नेमकी जाब तरी कोणाकडे मागायचा? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
……………………………
फोटो- सातारा नगरपालिकेच्या झाडाची रस्त्यावरील मंडपामुळे झाली अशी अवस्था….
