मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणच्या राजकोट किल्यावरील पुतळा भाजपाच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर माफी मागावी लागली. महाराष्ट्राची अस्मिता व स्वाभिमानासाठी आवाज उठवणा-या तमाम शिवप्रेमींचा व मुंबई काँग्रेसचा हा विजय आहे. छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही व झुकणारही नाही हे आज पुन्हा अधोरेखित झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली असली तरी ना खाऊंगा, ना खाने दुंगा अशी वल्गणा करणा-या मोदींच्या
नाकाखाली झालेल्या भ्रष्टचाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भाजपाला भ्रष्टाचाराचा भस्या रोग जडला आहे, किरकोळ कारवाई करून पाप झाकले जाणार नाही, याप्रकरणी संबंधित जबाबदार बड्या धेंडांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना प्रा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा भाजपाच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळल्याने जनतेच्या भावना तीव्र आहेत. या घटनेस जबबादार असणाऱ्यांवर सरकार कारवाई करत नाही परंतु महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेसाठी आवाज उठवणाऱ्यांवर भाजपाचे निर्लज्ज सरकार कारवाई करते. काँग्रेस नेते व पदाधिकारी यांना घरातून बाहेर पडू दिले नाही, हा कुठला न्याय आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी यासाठी मुंबई काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली होती परंतु गुजरात धार्जिण्या भाजपा युती सरकारने काँग्रेसचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता व महाराष्ट्राच्या स्वाभिमानापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुजरातची हुजरेगिरी करण्यात धन्यता वाटते. नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत शिवरायांच्या मावळ्यांचा आवाज पोहचू नये म्हणून फडणवीसांनी मोठा पोलीस फौजफाटा काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर ठेवला पण स्वाभिमानाचा या बुलंद आवाजाने दिल्लीच्या तानाशाहच्या कानाचे पडदेही फाडले व शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या भूमीत गद्दारांची गय केली जाणार नाही हेच दाखवून दिले.
महाराजांच्या पुतळ्याचे गुन्हेगार, बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारे खरे गुन्हेगार मोकाट आहेत, पोलिसांवर धावून जाणारे व घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपा नेत्यांवर कारवाई करण्याची हिम्मत देवेंद्र फडणवीसांमध्ये नाही. फडणवीस फक्त विरोधकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचा वापर करतात पण जनतेच्या भावना दुखवल्या आहेत, सरकारने हा आवाज कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी तो दबणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस व युती सरकारला जनता माफ करणार नाही. काँग्रेसचे आमदार अमिन पटेल, अस्लम शेख, भाई जगताप, सचिन सावंत, संदीप शुक्ला, प्रनिल नायर, महेंद्र मुणगेकर, कचरू यादव, सुरेशचंद्र राजहंस, डॉ ज्योती गायकवाड, अखिलेश यादव, रवी बावकर यांच्यासह नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवल्याबद्दल खासदार वर्षा गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपा युती सरकारचा धिक्कार केला.