तळमावले/वार्ताहर : डाकेवाडीत स्पर्धेच्या उपक्रमातून साकारत असलेल्या स्व.राजाराम डाकवे (तात्या) सार्वजनिक वाचनालयाला वाचनप्रेमींचे उत्स्फुर्त पाठबळ मिळत आहे. चाफळ (ता.पाटण) येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांनी त्यांच्याजवळ सुस्थितीत असलेली नामवंत लेखकांची 70 पुस्तके या वाचनालयाला देणार असल्याचे सांगत प्रोत्साहन दिले आहे. ना.शंभूराज देसाई आणि जयंत पाटील यांनी शुभेच्छासंदेश देवून शुभेच्छा दिल्या आहेत. तर साताऱ्याचा चाॅकलेट हिरो आकाश पाटील यांनी वाचनालयाबाबत व्हिडीओ क्लिप शेअर करत उपक्रमाला चार चाॅंद लावले आहेत.
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने स्व.राजाराम डाकवे (तात्या) सार्वजनिक वाचनालय सुरु करण्यात येत असून त्याला सर्व स्तरांतून सुंदर प्रतिसाद मिळत आहे. या वाचनालयाचे लोकार्पण राजाराम डाकवे यांच्या व्दितीय पुण्यस्मरणदिनी होणार आहे. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी, वाचनसंस्कृतीला प्रेरणा आणि बळ देण्यासाठी डाकवे परिवाराने राबवलेला उपक्रम प्रेरणादायी आणि कौतुकास्पद असाच आहे. आपणही पुस्तके देवून या वाचन चळवळीत सहभागी होवू शकता.
यापूर्वी डाकवे परिवाराने मान्यवरांचे स्वागत पुस्तकाने, भित्तीचित्र काव्य स्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, दिवाळी अंक स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार असे वाचन चळवळीला हातभार लावणारे उपक्रम राबवले जातात. याशिवाय स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून लिहण्यासाठी वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे.
समाजामध्ये वाचनसंस्कृती रुजावी, सुजाण सुसंस्कृत नागरीक घडावेत असा उदात्त हेतू ठेवून हे वाचनालय सुरु करण्यात येत आहे. पुस्तकाच्या नोंदीसाठी रजिस्टर तसेच उपक्रमाबाबतच्या सुचनांसाठी अभिप्राय वही देखील ठेवली जाणार आहे. वाचन चळवळीसाठी अनोखे पाऊल उचलेल्या डाकवे परिवाराच्या या कृतीचे परिसरातून कौतुक होत आहे.
राजाराम डाकवे यांच्या निधनानंतर डाकवे परिवाराने रक्षाविसर्जन ऐवजी वृक्षारोपण, कार्यादिवशी अनाथ मुलांना स्नेहभोजन, मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी, समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन, भित्तीचित्र काव्य स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, तीर्थरुप तात्या, तात्या, तात्यांची स्पंदने ई-बुक इ.पुस्तकांची प्रकाशने, साहित्य पुरस्कार, चित्रकला स्पर्धा असे अभिनव उपक्रम राबवत तात्यांच्या सामाजिक कार्याला एकप्रकारे वंदनच केले. गतवर्षी राजाराम डाकवे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनादिवशी त्यांच्या जीवनावर आधारित ‘तात्या’ हे पुस्तक प्रकाशित आहे.
या सार्वजनिक वाचनालयासाठी आपणही पुस्तके देवू शकता. पुस्तके देणाऱ्या व्यक्तिंना सहभागाबद्दल स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी जास्तीत दानशुरांनी या अनोख्या ज्ञानयज्ञात सहभागी व्हावे असे आवाहन डाकवे परिवाराने केले असून अधिक माहितीसाठी 9764061633 या क्रमांकावर संपर्क साधावा.
स्व.राजाराम डाकवे (तात्या) सार्वजनिक वाचनालयाला उत्स्फुर्त पाठबळ
RELATED ARTICLES