मुंबई (रमेश औताडे) : कुठेही न्याय मिळाला नाही की आझाद मैदान गाठायचे. सरकारला निवेदन द्यायचे. सरकारने आश्वासन दिले की गाव गाठायचे. मात्र आंदोलन झाल्यावर आपण आझाद मैदान किती स्वच्छ ठेवले ? याचा विचारही आंदोलनकर्त्यानी केला तर आम्हा स्वच्छ्ता कामगारांना थोडे परिश्रम कमी पडतील. भले मोठे आझाद मैदान साफ करताना आमच्या नाकी नऊ येतात, जरा आमचाही विचार आंदोलनकर्त्यानी केला तर बरे होईल असे मत स्वच्छ्ता दुत करत आहेत.
पाण्याच्या बाटल्या, तंबाखू गुटखा पाकीट, वडापाव भजी पाव खाऊन झाल्यावरचे कागद, पार्सल मागितलेले जेवणाची प्लास्टिक डिश, प्लास्टिक ग्लास, झेंडे, टोप्या, पत्रके, फलक, काळ्या निषेध करायच्या पट्ट्या, चहाचे कप आदी कचरा व पावसामुळे झालेला चिखल या सर्व कचऱ्यामुळे दुर्गंधी पाहता आंदोलन करत असताना पोलिस पत्रकार व स्वतः आंदोलन करणाऱ्यांना स्वच्छ वातावरण असेल तर आनंदी वाटेल. न्याय मागत असताना आपण काय करतोय याकडेही पहावे असे मत त्यांनी व्यक्त केले.