प्रतिनिधी (छत्रपती संभाजीनगर) : भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ताटाखालचे मांजर बनविले आहे. दोघांनाही भाजपच्या लेखी कवडीची किंमत ठेवलेली नाही. भाजप म्हणेल, तेच त्यांना करावे लागत आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
दानवे यांनी गुरुवारी (दि.४) छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला त्यांचे काही उमेदवार बदलावे लागले. त्याबाबत विचारले असता दानवे म्हणाले, एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार असो या दोघांची अवस्था सध्या वाईट झाली आहे. त्यांना भाजप म्हणेल तेच करावे लागत आहे. भाजपच्या सांगण्यावरुन त्यांना उमेदवार बदलावे लागत आहेत. याआधीही शिवसेना भाजपची युती होती. पण तेव्हा शिवसेनेचा उमेदवार कोण असावा, हे सांगण्याची भाजपची कधी हिंमत झाली नाही. कारण उमेदवार हा तो पक्ष ठरवत असतो. मित्र पक्षाला त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसतो. पण इथे भाजपने शिंदे, पवारांना ताटाखालचे मांजर बनविले आहे, असे दानवे म्हणाले. सध्या महायुतीची अवस्था वाईट झाली आहे. त्यांना राज्यात कुठेही कुवतीचे उमेदवार मिळत नाहीत, असा आरोपही दानवे यांनी केला.
छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आपला उमेदवार आधीच जाहीर केला आहे. पण महायुतीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. महायुतीत ही जागा शिंदे गट लढविणार असून त्यांच्याकडून पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पालकमंत्री भुमरे हे लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत, असा दावा दानवे यांनी केला. भुमरे लोकसभा लढविणार नाहीत, हे मी शंभर टक्के सांगतो, असेही ते म्हणाले.
भाजपने शिंदे आणि पवार यांना ताटाखालचे मांजर बनवले – दानवे
RELATED ARTICLES