
पांचगणी(रविकांत बेलोसे) : मुसळधार पावसाने जावळी तालुक्यात दाणादाण उडवली असून सनपाने – भालेघर रस्त्यावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्या असून भालेघर- मार्ली रस्ता पूर्णपणे भेगा पडून बंद झाला आहे. यामुळे दोन्ही गावची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
श्रावण महिना असूनही पडत असणाऱ्या पावसाने जावळी तालुक्यात हाहाकार उडवला आहे. पावसाने या परिसरातील घेवडा पीक पूर्णपणे गेले आहे. भालेघर या डोंगर माथ्यावरील गावाला जाण्यासाठी करहर – कुडाळ मुख्य रस्त्यावरील सनपाने या गावापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतराचा पूर्णपणे कराळ घाट रस्ता आहे. पावसाने या घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहे. त्यामुळे नागरिकांना पावसात या रस्त्यावरून चालणेही मुश्किल झाले आहे.
तर अशाच पद्धतीने भालेघर – मार्ली हा रस्ता दीन ठिकाणी पूर्णपणे भेगा पाडून खचला आहे त्यामुळे या दोन्ही गावचे दळणवळण ठप्प झाले आहे. दोन्ही गावांना जोडणारा हा रस्ता मेढ्याला जातो. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक चांगल्या प्रकारे आहे. त्यामुळे तातडीने हा रस्ता वाहतूक योग्य करावा अशी मागणी भालेघर व मार्ली परिसरातील नागरिकांनी केली आहे.
चौकट : डोंगरमाथ्यावर असणाऱ्या मार्ली, भालेघर, देवदेव, भोगवली मुरा, हातगेघर मुरा या गावातून अनेक मुले शाळेसाठी या रस्त्यावरून व घाटातून ये जा करीत असतात. हा रस्ता खचला असून काही ठिकाणी कोसळल्याने या विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे.