प्रतिनिधी : आपल्या समाजात अजूनही महिलांना तुच्छ समजल्या जाते. त्यामुळे महिलांचा दर्जा वाढण्यासाठी भारत सरकार ने सर्व महिलांना पी एच डी पर्यंत
मोफत शिक्षण द्यावे अशी सूचना आपण भारत सरकारला केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष,जागतिक कीर्तीचे रसायनशास्त्रज्ञ, युडीसीटीचे माजी प्रमुख पद्मश्री डॉ जी डी यादव यांनी नुकतीच दिली.ते प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समितीच्या वतीने मुंबईतील ऐतिहासिक नॅशनल लायब्ररी च्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी बाळासाहेब तोरसकर हे होते.
डॉ यादव पुढे म्हणाले की,
मी भारत सरकारच्या विविध समित्यांवर कार्यरत असून एका
समितीच्या माध्यमातून सरकारला सर्व महिलांना मोफत शिक्षण देण्याची सूचना केली आहे. एक महिला घडली तर दोन कुटुंबे घडतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तसेच शिक्षणामुळे समाज सुसंस्कृत होणे अपेक्षित आहे. कुठलेही आईवडील म्हणणार नाही की, माझा मुलगा गुंड व्हावा.तरीही असे का घडते? याचा विचार झाला पाहिजे.
भारत २०४७ पर्यंत पूर्ण विकसित देश व्ह्यायचा असेल तर उद्योग धंद्यात २४ टक्के तर सेवा क्षेत्रात ७० टक्के वाढ झाली पाहिजे.यासाठी देशात
उद्योजकता वाढली पाहिजे, असे सांगून ज्याच्यात गुणवत्ता असते ती व्यक्ती पुढे आली येतेच याचे उदाहरण म्हणून त्यांनी स्वतःचे उदाहरण दिले. लहानपणी आपण देवळात भरणाऱ्या शाळेत शिकलो. पुढे हायस्कूल सुध्दा गावापासून दूर होते तर रोज चालत जायचो आणि चालत यायचो असे सांगून त्यांनी त्यांचा जीवन प्रवास उलगडला. या वेळी
डॉ यादव यांनी,काही नेते मंडळी त्यांच्या भाषणात जसे या ठिकाणी…या ठिकाणी… असा उल्लेख करतात,तसाच उल्लेख प्रास्ताविकात प्रा नागेश हुलावळे यांनी केल्याचे सांगून या ठिकाणी,त्या ठिकाणी,ठीक ठिकाणी…. अशी स्वतःची शीघ्र कविता सादर करून सर्व उपस्थितांची दाद मिळवली. खरं म्हणजे आपल्याला कवीच व्हायचे होते पण कविता करून पोट भरत नाही,म्हणून शास्त्रज्ञ झालो,असे त्यांनी म्हणताच हास्याची प्रचंड लाट उसळली. इतका मोठा शास्त्रज्ञ पण इतका साधा,कवी मनाचा, नर्म विनोदी असू शकतो हे पाहून सर्वांचा त्यांच्या विषयीचा आदर द्विगुणित झाला.
दुसरे प्रमुख पाहुणे अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासा चे शास्त्रज्ञ डॉ डेरेक एंजल यांनी आपल्या छोटेखानी भाषणात ,आजच्या पिढीने उद्याच्या पिढीसाठी शिडी बनून काम करावे,असे आवाहन केले.
जेष्ठ पत्रकार श्री सुकृत खांडेकर यांनी त्यांच्या भाषणात लोकशाहीत मतदार सर्वात शक्तिवान आहे त्यामुळे विरोधी पक्षनेते सुध्दा पंतप्रधान होऊ शकले.बाबासाहेबांनी सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे,त्यामुळे हे शक्य झाले असून ४०० पार चा नारा देणाऱ्या भा ज पा ला २०४ जागांवर थांबावे लागले,
काँग्रेस चे १०० खासदार निवडून येऊन राहुल गांधी विरोधी पक्षनेते होऊ शकले .तसेच लोकशाही मुळेच देश अखंड राहिला ही लोकशाही ची ताकद आहे असे सांगून गौरव शाली राजकीय परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात आज चालू असलेल्या राजकारणाविषयी खेद व्यक्त केला.
या कार्यक्रमात न्यूज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांना उत्कृष्ट संपादक पुरस्कार देऊन तर विविध क्षेत्रातील व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.