Sunday, August 24, 2025
घरमहाराष्ट्रखातगुणमध्ये एस.टी. थांबणार संवादिनीचे श्री .लावंड यांचा पाठपुरावा

खातगुणमध्ये एस.टी. थांबणार संवादिनीचे श्री .लावंड यांचा पाठपुरावा



खटाव (अजित जगताप) : स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा असलेल्या सातारा जिल्ह्यातील मौजे खातगुण ता खटाव या गावात एस. टी. थांबा मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे संवादिनीचे अध्यक्ष अगस्ती अरुण लावंड यांनी पाठपुरावा केला. त्यांनी खातगुणला एस.टी. थांबा देण्याबाबत संबंधितांना उचित सूचना दिल्या आहेत. यामुळे खातगुणच्या विद्यार्थी व आजारी रुग्ण / वृद्ध आणि भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

क वर्ग देवस्थान असलेल्या खातगुणमध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या पंचात्तरीनंतरही साधी एस.टी. आलेली नाही. गावची लोकसंख्या सुमारे ४००० च्या आसपास आहे. गावात दवाखाने माध्यमिक शाळा, कॉलेजची व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थी व आजारी रुग्ण / वृद्ध यांना तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे खटाव, पुसेगाव, कोरेगाव, फलटण व्हाया साताऱ्याला जावे लागते. पण तिथे जाण्यासाठी गावाच्या बाहेर २ ते २.३० किमी मुख्य रस्त्यावर येऊन एस. टी. गाडीचे दर्शन होते. त्यानंतर प्रवास सुरू होतो.

याचा फटका विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या शिक्षणावर पडत आहे. शाळा, कॉलेजच्या हजेरीवर याचा परिणाम होत आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो. रुग्ण व वृद्ध यांना खाजगी गाडी करून जावे लागते.

खातगुण गावात प्रसिद्ध राजेबागसार पीरसाहेबांचा दर्गा आहे. तिथे आजूबाजूच्या परिसरातून शेकडो भाविक येत असतात. पण ज्यांच्याकडे खाजगी गाड्या आहेत, तेच येऊ शकतात. गरीब भाविकांची प्रचंड गैरसोय होते. गाव तिथे एस. टी. हे आपलं ब्रीद आहे. पण खातगुण गावाने एस. टी. पाहिलीच नाही. पूर्वी रस्ते चांगले नाहीत. हे कारण होतं, पण आता रस्ते ठीक आहेत. मुख्य रस्तावरून गावात एस. टी. यायला जेमतेम २ मिनिट लागतात. अशी परिस्थिती श्री लावंड यांनी एस.टी. व्यवस्थापकीय संचालक यांना सांगितली.

वडुज, कोरेगाव, फलटण, सातारा डेपोच्या एस.टी. ज्या मौजे खातगुण गावबाहेरून जातात या जवळच्या पल्ल्याच्या सर्व गाड्या गावात थांबा घेऊन वळसा घालून गेल्यास तसेच मुक्कामी एसटी मिळाल्यास खातगुणचे सर्व गांवकरी, भाविक, विद्यार्थी, वृध्द, रुग्ण, आपले उपकृत होऊ, अशी विनंतीही त्यांना केली. श्री लावंड यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत एस.टी.च्या व्यवस्थापकीय संचालक यांनी याबाबत तातडीने संबंधितांना उचित कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. आता लवकरच खातगुणमध्ये एस.टी. गाडी येईल त्याचे पूजन करून त्याचे स्वागतही करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments