Sunday, August 24, 2025
घरमहाराष्ट्रनव्यांचे स्वागत करा पण जुन्यांना विसरू नका वाईत चर्चा…

नव्यांचे स्वागत करा पण जुन्यांना विसरू नका वाईत चर्चा…

सातारा(अजित जगताप) : राजकारण हे असे क्षेत्र आहे की, ज्या ठिकाणी सर्वकाही करता येते. निष्ठा व निष्टून जा अशी नाण्याच्या दोन बाजू राजकारणात असतात. हे मान्य आहे. परंतु, नव्यांचे स्वागत करताना जुन्यांना विसरू नका. अशी आता राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या वाई विधानसभा मतदारसंघात चर्चा सुरू झालेली आहे. सातारा जिल्ह्यातील दक्षिण काशी समजणाऱ्या वाई- खंडाळा- महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय पटलावर शांतता आहे. या शांतते मध्ये एक सुखद धक्का म्हणजे आदरणीय माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा बोपेगाव चे सुपुत्र श्री नितीन लक्ष्मणराव पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अप) गटाचे राज्यसभा खासदार म्हणून वर्णी लागलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा राजकीय पटलावर वाई विधानसभा मतदारसंघाचे राजकारण चांगलेच तापू लागलेले आहे. वाई तालुक्यातील तीन दिग्गज नेते म्हणजे आदरणीय प्रतापभाऊ भोसले, आदरणीय मदनआप्पा पिसाळ व आदरणीय लक्ष्मणतात्या पाटील या तीन दिग्गज नेत्यांच्या राजकारणातील त्रिवेणी संगमामुळे वाई मतदार संघातील अनेकांना चांगली संधी मिळाली. हे नाकारून चालणार नाही. वाई- खंडाळा- महाबळेश्वर तालुक्याच्या राजकारणात तसं पाहिले तर महाबळेश्वरचे माजी आमदार व स्वातंत्र्यसैनिक भिकू दाजी भिलारेगुरुजी, बाळासाहेब भिलारे, राजेंद्र राजपुरे, डी.एम. बावळेकर, संजय गायकवाड व खंडाळा तालुक्यातील बकाजीराव पाटील, शंकराव गाडवे ,नितीन भरगुडे- पाटील व उदय कबुले आणि वाई तालुक्यातील सुरेश वीर, शशिकांत पिसाळ, मनोज पवार, नारायणराव पवार, सौ अरुणाराजे पिसाळ हेमलता ननावरे, प्रसाद सुर्वे अशी भली मोठी नावे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पक्षाच्या विचार व धैर्य धोरणानुसार संधी मिळालेले नेतेगण आहेत. यामध्ये नशीबवान ठरले ते म्हणजे माजी आमदार मदन भोसले व मकरंद पाटील कारण हे दोन्ही खासदारांचे पुत्र असल्यामुळे राजकीय नेत्यांनी सुद्धा त्यांच्यावर वरदहस्त ठेवले. आज राजकीय परिस्थिती बदलली असून एकाच घरात खासदार किंवा आमदारकी असल्यामुळे आता राष्ट्रवादीला आपण जे केले ते दुरुस्त करण्यासाठी भाजपच्या गोठात गेलेल्या वरिष्ठ नेत्यांचा आधार घ्यावा लागत आहे. हा नियतीने उगवलेला सूड समजा किंवा राजकारण पण हे कधीतरी घडणारच होते. त्याची आता पुसटशी कल्पना येऊ लागलेली आहे. ज्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी सोडलेली आहे. त्यांनी हे दोन्ही पक्ष सोडून भाजपच्या वळसणी खाली गेले ते सत्तेमध्ये सामील होण्यासाठी हे आता लपून राहिलेले नाही. सत्तासुंदरी ही सर्वांनाच हवी असते. त्यासाठी मग नैतिकता पाळण्याची कुठलीही अट नसते. हे सातारा जिल्ह्यात अनेकांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. रविवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सातारा येथील भाजप नेते माजी आमदार मदन भोसले व भाजप युवती जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आणि या भेटी मध्ये प्रथम दर्शनी राजकारण जरी नसले तरी सध्या वाई तालुक्यातील राजकीय हालचालींमुळे तो संदर्भ लावला गेलेला आहे. असो… राजकारणामध्ये सर्व गुन्हे माप असतात. आणि बेरजेचे राजकारण करताना सर्वांनाच सामावून घेणे हे यशाची गुरुकिल्ली ठरते. या अर्थाने आता माजी आमदार मदन दादा भोसले यांची पाऊले चालली राष्ट्रवादीच्या वाटेवर असं म्हणण्यास तूर्त तरी वाव आहे. वास्तविक पाहता जातीयवादी पक्ष म्हणून कधीतरी मंचकावर उल्लेख केलेल्या भारतीय जनता पक्ष कुणासाठी आता अस्पृश्य राहिलेला नाही किंवा जातीयवादी ही राहिलेला नाही. त्यामुळे कोणी कुठेही गेले? तरी राजकारणामध्ये शाप अथवा उशाप मिळत नाही. तरीही ज्यांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर एकाकीपणाने खिंड लढवली. अशा काही लढाऊ मंडळींना आता नव्या खेळाडूंसाठी मैदानात जाऊन पाणी द्यावे लागणार आहे. वेळ पडल्यास बॅट बदलावी वाटली तर बॅट द्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. शेवटी बेरजेच्या राजकारणामध्ये ज्याची संख्या जास्त त्याची बेरीज केली जाते आणि ज्याची संख्या कमी त्याची वजाबाकी केली जाते हे न समजण्याइतके कोणी आता राजकारणात अडाणी राहिलेले नाही. तूर्त सध्या तरी नव्याचे स्वागत करताना जुन्यांचा विसर पडू देऊ नका. अशी आता वाई तालुक्यातील नव्हे तर वाई- महाबळेश्वर- खंडाळा तालुक्यात व परिसरात पावसाच्या पुनरागमनानंतर जशी चर्चा होती. तशी चर्चा आता धबधबा सारखी फेसाळू लागलेली आहे. अजून घोडे मैदान जरी लांब असले तरी सध्या जोरात तालीम व चाचपणी सुरू झालेली आहे. हे वाई मतदारसंघ पुरतो मर्यादित न राहता त्याचे लोण सातारा जिल्ह्यात कधी पोहोचते. याची आता अनेकजण वाट पाहत आहेत. दरम्यान, याबाबत वेट अँड वॉच अशी प्रतिक्रिया अनेक राजकीय मंडळींनी देऊन हम भी कुछ कम नही… असाच छुपा संदेश दिलेला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments