तळमावले/वार्ताहर : नेहमीच वैविध्यपूर्ण कलाकृती साकारणारे पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी गोकुळअष्टमीचे औचित्य साधत मधुबनी चित्रशैलीमध्ये श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी यांचे चित्र साकारत गोकुळअष्टमीच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या चित्रामध्ये बाल श्रीकृष्ण शिंक्यावरील मडक्यातून खाली ओतत असून दुसरा सवंगडी ते खालील मडक्यात घेत आहे. तर तिसऱ्या सवंगडयाने कृष्णाला खांद्यावर घेतले आहे. एक सवंगडी कृष्णाला धरत असल्याचे अप्रतिम चित्र तयार केले आहे. खाली मडक्यांची उतरंड आहे. एका मडक्यात रवी आहे. डाव्या कोपऱ्यात दोन पक्षी बसलेले आहेत. सुंदर पध्दतीने तयार केलेल्या या चित्रात बारकावे दिसत आहेत.
मधु म्हणजे मध आणि बनी म्हणजे वन, जंगल अशी या नावाची व्युत्पत्ती आहे. मधुबनी चित्रशैली हा कला प्रकार भारताच्या मथुरा प्रांतात विशेष प्रचलित आहे. या शैलीला मिथिला शैली असेही म्हणले जाते. बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात ह्या कलेचा उगम झालेला दिसतो तर नेपाळ हे सुद्धा या कलेचे केंद्र मानले जाते. मधुबनी शहर हे या चित्रांच्या निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र आहे. अशा अर्थाने मधुबनी ही चित्रशैली स्थानिक लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहे. या शैलीमधे विशेष करून राधा-कृष्ण, गणपती या देवता, मासा, मोर, पशु, पक्षी, वृक्ष, पाने, फुले, इ.चा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे भडक रंगांचा वापर करून ही मधुबनी चित्रशैलीत चित्रे काढली जातात.
कलेतून सामाजिक बांधिलकी असलेल्या शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी मधुबनी चित्रशैलीत साकारलेल्या श्रीकृष्णाच्या प्रसंगाची परिसरात प्रशंसा होत आहे
