सातारा (अजित जगताप) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक व शिपाई पदासाठी खाजगी एजन्सी मार्फत अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सध्या वाढत्या बेरोजगारीमुळे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. अशा वेळेला यश संपादन करण्यासाठी अभ्यास, सातत्य व मार्गदर्शन म्हणजे यश मिळणार आहे. त्यामुळे धनंजय राव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्र बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने मोफत एक दिवसीय कार्यशाळा झाली. याला उदंड प्रतिसाद लाभला आहे .
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा घटक महाविद्यालय धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने आय.बी.पी.एस. मार्गदर्शन केंद्र व अर्थशास्त्र व बँक मॅनेजमेंट विभाग यांच्या वतीने नुकतीच मोफत कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ रजिस्टर डॉ. विजय कुंभार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी? कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा? याचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभल्यामुळे त्यांच्यामध्ये जिद्द निर्माण झालेली आहे. कोणतीही पूर्व परीक्षा अथवा लेखी परीक्षा ही कठीण नसते तर ती फार सोपी असते. यासाठी सर्वांनाच त्याचा फॉर्मुला समजणे हे यशाची गुरुकिल्ली आहे. अनेक यशस्वी लोक हे मार्गदर्शन व प्रशिक्षण घेऊनच यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी असा फॉर्म्युला मिळवण्यासाठी प्राधान्य व प्रयत्न करणे गरजेचे आहे. असा फॉर्मुला मार्गदर्शन व कार्यशाळेतूनच उपलब्ध होतो. तसेच परिपूर्ण नियोजनबद्ध अभ्यासाला कुठलाही दुसरा अल्टरनेट पर्याय नाही. परंतु अभ्यास कशा पद्धतीने करावा? याचे मार्गदर्शन ही तितकेच महत्त्वाचे आहे. तपशीलवार अभ्यास करताना अंकगणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, बँकिंग आणि सहकार क्षेत्र, संगणक व आय.टी. तसेच मुलाखतीचे स्वरूप, मुलाखतीची तयारी या सर्व गोष्टींना आवश्यक असणाऱ्या बाबी हे जेष्ठ व मार्गदर्शक यांच्याकडूनच प्राप्त होते.
या महाविद्यालयांमध्ये झालेल्या मोफत झालेल्या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर टी डी महानवर सर यांचेही मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरले आहे. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. रोहिणी भोसले यांनी केले व प्रा. भाग्यश्री वाघडोळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी एन.सी.सी. विभागाचे प्रमुख डॉ. राजशेखर निल्लोक व इतर प्राध्यापक व महाविद्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गाचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेसाठी अनेक इच्छुक उमेदवार व विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करून उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांनाच यशस्वी होण्यासाठी गुरुजनांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
