मुंबई (रमेश औताडे) : मी कंत्राटी कामगार होतो मग कायम झालो होतो. कंत्राटी कामगारांना कायम करण्याची एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया मला माहिती आहे. त्यामुळे आता कंत्राटी कामगारांचा हा भव्य मोर्चा मंत्रालयावर घेऊन जायचे नाही, मंत्रालयच आझाद मैदानात आणायचे. तुम्हाला कसे कायम करत नाहीत बघुया. असा इशारा आमदार सचिन अहिर यांनी आझाद मैदानात दिला.
कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्राच्या वतीने शुक्रवारी आझाद मैदान मुंबई येथे राज्यभरातील विविध आस्थापनामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा आलेल्या आक्रोश मोर्चाच्या वेळी बोलत होते. सरकारी ,निमसरकारी, महापालिका, शिक्षक, डॉक्टर सुद्धा कंत्राटी पद्धतीने नेमले जातात अशी स्थिती आहे. हे योग्य नाही असे अहिर म्हणाले.
कंत्राटीत कामगारांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे हे विसरता कामा नये. कायम कामगारां एवढे किंवा जास्तच काम कंत्राटी कामगार करतात परंतु त्यांना कायम कामगारांच्या तुलनेत अत्यंत अल्प वेतनावर राबवून घेतले जाते. असे कॉ. डॉ. डी एल कराड म्हणाले.
सर्व आस्थापनांमधील कंत्राटी कामगार प्रथा बंद करा. त्यासाठी कंत्राटी कामगार कायदा रद्द करा. आजच्या सर्व कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा. सरकारने कामगार संघटनांशी कुठली चर्चा न करता मंजूर करवून घेतलेल्या श्रम संहिता (लेबर कोड) रद्द करा.आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
इंटकचे गोविंदराव मोहिते, कॉ. उदय भट, संतोष चाळके, डॉ. ताप्ती मुखोपाध्याय बुक्टू, विजय दळवी, मिलिंद रानडे, मारुती विश्वासराव, राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, टी यु सी आय, ए आय आय इ ए, टी आय बी ए, बीफी, श्रमिक एकता संघ, कामगार एकता इतर संघटना सहभागी झाल्या होत्या.