Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रअदानी कंपनीतील महाघोटाळ्याची चौकशी ईडी का करत नाही ? वर्षा गायकवाड

अदानी कंपनीतील महाघोटाळ्याची चौकशी ईडी का करत नाही ? वर्षा गायकवाड

मुंबई : केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून मागील १० वर्षात लाडका उद्योगपती योजना सुरु असून मोदी सरकारच्या आशिर्वादाने अदानी कंपनी देशाची संपत्ती भ्रष्ट मार्गाने लुटत आहे. हिंडनबर्ग अहवालातून अदानीच्या घोटाळ्याचा फुगा फुटला असून भाजपाचे मोदी सरकार अदानीच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे.विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करणारी ईडी अदानी कंपनीच्या घोटाळ्याकडे मात्र डोळे बंद करून पहात आहे. अदानीच्या महाघोटाळ्याची ईडी चौकशी करा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

अदानी महाघोटाळ्याची चौकशी ईडीने करावी या मागणी साठी खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसने ईडी ऑफीसवर हजारोंचा मोर्चा काढला. हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पण कार्यकर्ते हटले नाहीत, त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, हिंडनबर्गने अदानी कंपनीतील घोटाळा पुराव्यासह उघड केल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी करण्याची जबाबदारी सेबीकडे देण्यात आली होती पण सेबीच्या प्रमुख माधवी बुच याच या घोटाळ्याच्या लाभार्थी असल्याचे समोर आले आहे मग चोरी करणारा चौकशी कसा करेल. शेअर बाजारात सर्वसामान्य व मध्यम वर्गातील लोकांनी आपल्या कष्टाचा पैसा गुंतवलेला आहे, तोही सुरक्षित राहिलेला नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर धडक कारवाई करणारी ईडी अदानी कंपनीचा महाघोटाळा उघड झाला तरी त्यांची चौकशी का करत नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला.

अदानी कंपनीतील महाघोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे पण केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जेपीसी चौकशी करत नाही. अदानी घोटाळा सेबी व देशाच्या पंतप्रधानांभोवती फिरत असताना चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी. केंद्रातील नरेंद्र मोदींचे एनडीए सरकार जेपीसी चौकशीला का घाबरते, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
सेबीने दिली सुट, अदानी करतो लुट व ईडी बसलीय चुप; ईडी सेबी भाई भाई, अदानी लुटतोय देशाची कमाई, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या मोर्चात माजी मंत्री अस्लम शेख, माजी खासदार हुसैन दलवाई, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश यादव, संघटन प्रभारी प्रेनिल नायर, खजिनदार संदीप शुक्ला, जिल्हा अध्यक्ष रवी बावकर, मोहसीन हैदर, कचरू यादव, बाळा सरोदे, अर्शद आजमी, आनंद शुक्ला, अशोक गर्ग, रोशन शाह, हिना गजाली, सुभाष भालेराव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments