प्रतिनिधी : श्रावण महिना सुरु होताच अनेक सणांची रांग लागते. नुकतेच नागपंचमी, श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर आता सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोकुळाष्टमीचे वेध लागले आहेत. हिंदू धर्मात कृष्णजन्माष्टमीला सर्वात जास्त महत्व आहे. कारण या दिवशी श्रीविष्णूंचा आठवा अवतार श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे राज्यभरात दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. विशेषत: याकाळात मुंबईत दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामुळे गोपाळकालाच्या दोन आठवडा आधीपासूनच दहिहंडीची तयारी करण्यासाठी युवक सज्ज होतात. यंदा २६ ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी साजरी केली जाणार असून या उत्सवाच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीसही सज्ज झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळाष्टमीनिमित्त मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक नियमावली आणि आदेश जारी केले आहेत. मुंबई पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, पादचाऱ्यांवर पाणी ओतणे, पाण्याचे फुगे मारणे तसेच गुलाल उधळण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिकरित्या अश्लील शब्दांचा उच्चार करणे, घोषणाबाजी करणे तसेच अश्लील गाणी गाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. २६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून २७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू होणार आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई होणार आहे.
कशावर घालण्यात आले निर्बंध?
- सार्वजनिकरित्या अश्लील शब्दांचे उच्चार किंवा घोषणा किंवा अश्लील गाणी गाणे.
- हातवारे किवा नक्कल प्रस्तुतीकरणांचा वापर आणि तयार प्रतिमा, चिन्हे, फलक, किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे ज्यामुळे प्रतिष्ठा, शालीनता किंवा नैतिकता दुखावते.
- पादचाऱ्यांवर रंगीत पाणी किंवा फवारे, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे.
- रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे किंवा फेकणे.