पांचगणी : ग्रामदैवत जननी , केदारेश्वर मंदिर हे काटवलीच्या आध्यात्मिक व धार्मिक परंपरेचे श्रद्धास्थान आहे. ग्रामस्थ व भक्तांनी कायम मंदिराच्या संपर्कात राहिल्यास आपल्या सभोवतलची सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणार आहे. काटवलीचा सामाजिक व धार्मिक एकोपा या मंदिराच्या निमित्ताने कायम टिकणार असल्याचे प्रतिपादन वाईचे मठाधिपती महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांनी केले.
काटवली (ता. जावळी ) येथील मंदिरात श्री जननी,केदारेश्वर आणि जानाई तसेच श्री गणेश, श्री साईबाबा, श्री शंकर, गरुड आणि शिपाई या देवांच्या मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ प्रसंगी वाईचे मठाधिपती महादेव शिवाचार्य वाईकर महाराज मार्गदर्शन करीत होते.
दीर्घकाळानंतर जननी देवी मंदिरास पूर्णत्व आल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. असे मंदिर दुर्मिळ मंदिर असून काटवली चे वैभव वाढविणारे आहे. त्यामुळे येथे भविष्यात पर्यटक सुध्दा येतील. आपल्या मनातील नकारात्मक ऊर्जा संपवण्यासाठी मंदिरांचा उपयोग होत असून हा लोकोत्सव कौतुकाचा सोहळा आनंद देणारा असल्याचेही यावेळी मठाधिपती महादेव शिवाचार्य वाईकर यांनी सांगितले.
हजारो भाविकांच्या उपस्थितीत जननी देवी तसेच ज्ञानेश्वर मंदिराचा कलशारोहण आणि मूर्तींचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. दरम्यान तीन दिवस मंदिरात होमहवन, पूजापाठ, तीर्थ प्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या मंदिराचे बांधकाम वीस वर्षापूर्वी ग्रामस्थांनी लोक सहभाग व दात्यांच्या मदतीतून केले होते. यावेळी मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले असून मंदिरातील मुख्य मूर्तींचे गावात बैलगाडीतून भव्य असे स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत डोक्यावर कलश घेवून महिला सहभागी झाल्या होत्या तसेच शालेय मुले व महिलांचे लेझिम पथक मुख्य आकर्षण ठरले. ठिकठिकाणी या मूर्तींचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, युवक, व महिला यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास काटवली ग्रामस्थ, पै पाहुणे तसेच परिसरातील नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.