प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ मतांच्या राजकारणासाठी विरोधकांच्या वतीने धारावीकरांच्या मनात संभ्रमाचे वातावरण तयार केले जात आहे. याचाच प्रत्यय रविवारी विरोधकांनी धारावीत आयोजित केलेल्या सभेतून धारावीकरांना आला. कोणतीही माहिती न घेता उबाठाच्या युवराजांनी 500 स्क्वेअर फुटांचे घर, संक्रमण शिबिर, माहीम निसर्ग उद्यान, कांदळवन आणि पात्र – अपात्र या नेहमीच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा धारावीकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तसेच पुनर्विकास प्रक्रियेचा संबंध धार्मिक भावनांशी लावून धारावीतील सलोख्याचे वातावरण गढूळ करण्याचा देखील प्रयत्न या सभेतून करण्यात आला. या सभेतून ज्या मुद्द्यांच्या आधारे धारावीकरांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याबाबतची वस्तूस्थिती पुढील प्रमाणे आहे.
1. संक्रमण शिबिर :
वास्तविक, धारावी पुनर्विकास प्रकल्पात कोणतेच संक्रमण शिबीर उभारले जाणार नसून लाभार्थ्यांना थेट नव्या घरात प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे वांद्रे रेक्लेमेशन येथे संक्रमण शिबिर उभारण्याचा प्रश्नच येत नाही.
2. 500 स्क्वेअर फुटांचे घर :
धारावी पुनर्विकास प्रकल्पाची व्याप्ती आणि मर्यादा लक्षात घेता धारावीकरांना 350 स्क्वेअर फुटांचे मोफत घर देण्याचा निर्णय या आधीच्याच सरकारने घेतला होता. त्यामुळे आता केवळ या प्रकल्पात खोडा घालण्यासाठी 500 स्क्वेअर फुटांच्या घराचा मुद्दा वारंवार विरोधकांकडून चर्चेला आणला जात आहे.
3. माहीम निसर्ग उद्यान आणि कांदळवन :
धारावीचा पुनर्विकास करताना माहीम निसर्ग उद्यान आणि धारावीच्या आजूबाजूच्या परिसरातील कांदळवन संरक्षित ठेवले जाईल, याची तरतूद या आधीच करण्यात आली आहे. मात्र,निसर्ग उद्यान आणि कांदळवन नष्ट केले जाईल, असा अपप्रचार विरोधकांकडून सुरू आहे.
4. पात्र आणि अपात्र : धारावी पुनर्विकास हा राज्य शासनाचा विशेष दर्जा प्राप्त झालेला प्रकल्प असून, हा एकमेव असा प्रकल्प आहे ज्यामध्ये पात्र आणि अपात्र या दोघांनाही हक्काचे घर दिले जाणार आहे. पात्र रहिवाशांना धारावीतच 350 स्क्वेअर फुटांचे मोफत घर दिले जाणार असून अपात्र रहिवाशांना प्रधानमंत्री आवास योजनेतून मुंबई मध्येच हक्काचे घर मिळणार आहे. हा निकष अंतिम करताना कोणत्याही प्रकारचा आक्षेप विरोधकांनी घेतला नव्हता किंबहुना आधीच्या सरकारच्या काळातच हा निर्णय घेण्यात आला होता. तरीही, आता केवळ मतांच्या राजकारणासाठी धारावीकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे.
5. धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि धार्मिक संवेदना :
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पातून धारावीचा पुनर्विकास करतानाच, धारावीकरांच्या आर्थिक-सामाजिक प्रगतीतून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हा विकास करताना राज्य सरकारकडून कोणताही भेदभाव करण्यात येत नसून ‘मिनी इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीतील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये, ही विनंती करतो.
वास्तविक, गेल्या अनेक दशकांपासून रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला महायुतीचे सरकार आल्यानंतर गती मिळाली आहे. स्थानिक जनतेला पुनर्विकासाची प्रतीक्षा असताना धारावी बाहेरील लोकांकडून पुनर्विकास प्रक्रियेत खोडा घालून धारावीकरांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. त्यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या शासकीय सर्वेक्षणात बाधा आणणाऱ्या धारावी बाहेरील लोकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे करणार आहे.