
भिलार (तालुका महाबळेश्वर ) : येथील हिलरेंज माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी व हरितसेना यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या सुमारे १ मीटर व्यासाच्या राख्या झाडांना बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. निसर्गामध्ये झाडे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते, त्याची मानवी जीवनात आवश्यकता आहे. याची जाणीव सर्वांनाच आहे. प्रत्येक झाड जगले पाहिजे, झाडाचे संवर्धन झाले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ तेजस्विनी भिलारे यांनी केले.
या वेळी सजीव सृष्टीचे रक्षण करणाऱ्या निसर्गाला मानवजातीच्या रक्षणाचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थिनींनी झाडाला राखी बांधून भाऊ मानून, तुझी आम्हाला गरज असल्याचे मत व्यक्त केले.
भिलार येथील हिलरेंज माध्यमिक विद्यालयात वृक्षाप्रती अस्था व्यक्त करण्यासाठी झाडाला राखी बांधण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
हिलरेंज माध्यमिक विद्यालय व हरित सेने मार्फत असे विविध उपक्रम सातत्याने हाती घेऊन निसर्ग संवर्धनाविषयी जनजागृती करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात येतो. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
या वेळी हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे सचिव जतिन भिलारे,विद्यालयाचे
मुख्याध्यापक मुकुंद शिंदे, विनायक बगाडे, कल्पेश गायकवाड, शांताराम जाधव, संगीता खरात, सुजाता पार्टे , राजू मोरे, योगिता रांजणे व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक मुकुंद शिंदे म्हणाले भविष्यात मानवाच्या रक्षणासाठी जीवसृष्टी वाचवण्याची गरज असल्याने व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करून व असणाऱ्या झाडांची काळजी घेऊन त्यांचे रक्षण करण्याची गरज आहे.
वृक्षांचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थी व शिक्षकांनी वृक्षांना राख्या बांधण्याचा आगळावेगळा उपक्रम साजरा केला. संस्थेचे संचालक जतिन भिलारे यांनी विद्यार्थ्यांना मानवाचे रक्षण करणाऱ्या निसर्गाचे रक्षण करण्याचे आवाहन केले. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन कल्पेश गायकवाड यांनी केले तर विनायक बगाडे यांनी आभार मानले.