Monday, August 4, 2025
घरमहाराष्ट्रराष्ट्रवादी'च्या प्रदेश सरचिटणीसपदी प्रशांत यादव यांची निवड

राष्ट्रवादी’च्या प्रदेश सरचिटणीसपदी प्रशांत यादव यांची निवड

प्रतिनिधी : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश सचिव रवींद्र पवार, निरीक्षक बबनराव कनावजे यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई(शांताराम गुडेकर ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी प्रशांत यादव यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. 16) सायंकाळी मुंबईतील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रशांत यादव यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत यादव यांची झालेली ही निवड चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. मुंबईत राष्ट्रवादी भवन मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव रवींद्र पवार, रत्नागिरी जिल्ह्याचे निरीक्षक बबनराव कनावजे, राष्ट्रवादीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेशशेठ बने, महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर, चुकून तालुक्याचे अध्यक्ष मुराद अडरेकर, संगमेश्वर तालुक्याचे अध्यक्ष बाबाशेठ साळवी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, राष्ट्रवादी मुंबईच्या सचिव मेहजबीन नागुठणे, राष्ट्रवादी युवकचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, विवेक कनावजे, प्रशांत यादव यांचे स्वीय सहायक गुलजार गोलंदाज आदी उपस्थित होते. चिपळूण तालुका काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशांत यादव यांनी आपल्या समर्थकांसह 27 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. शरद पवार यांच्या उपस्थितीतच त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा झाला होता. त्यानंतर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा चिपळूणचे माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत यादव यांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जोमाने काम करत आहेत. जिल्हाध्यक्ष सुरेशशेठ बने यांच्यासह चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील प्रदेशस्तरावरचे तसेच जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, विविध विभाग आणि सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना उत्तमपणे साथ देत आहेत. अशातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत यादव यांची मा. शरद पवार यांनी केलेली ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. प्रशांत यादव यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्यानिमित्त त्यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

………..
चौकट

जोमाने कामाला लागा : शरद पवार

दरम्यान, कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी प्रशांत यादव यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातून उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा केली. यावेळी पवार साहेबांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि सर्वांनी जोमाने कामाला लागा, अशी सूचना केली. तसेच यावेळी त्यांनी वाशिष्ठी डेअरीच्या प्रगतीबाबतही यादव यांच्याकडे मोठ्या आपुलकीने विचारपूस केली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments